सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क
सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्याच्या ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत 35.71 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाची भराव क्षमता 33.93 टक्क्यांवर पोहोचली आहे. धरण क्षेत्रात सुमारे 93 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात ७ जुलैअखेर सरासरी 288.7 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात तब्बल २२ महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. महाबळेश्वर महसूल मंडळात सर्वाधिक 392.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल लामज, बामणोली आणि तापोळा येथे प्रत्येकी 169 मि.मी., वाठार येथे 148.5 मि.मी., पाचगणी 136.5 मि.मी., करहर व केळघर येथे 124.5 मि.मी., पसरणी 110.3 मि.मी. आणि पाटण येथे 100.5 मि.मी. पाऊस झाला.
अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर, जावली आणि वाई तालुक्यांतील एकूण 94 नागरिकांचे सुरक्षित स्थळी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, मंदिरे आणि नातेवाईकांच्या घरी हलविण्यात आले असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील 83 घरांचे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यात सर्वाधिक 39, सातारा 9, जावली 11, वाई 13, महाबळेश्वर 9 आणि खंडाळा 2 घरांची पडझड झाली असून संबंधित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय केरी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडून नुकसान झाले असून मिरजे येथील प्राथमिक शाळा आणि स्मशानभूमीची संरक्षक भिंत कोसळली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धबधबे, ओढे आणि पाण्याचा वेग असलेल्या पर्यटनस्थळांवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. झाडे पडणे, दरडी कोसळणे किंवा रस्ते खचल्याच्या घटना घडल्यास तातडीने मार्ग मोकळे करण्याचे तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा :
कोयना : 35.71 टीएमसी (33.93%)
धोम : 6.59 टीएमसी (48.81%)
धोम-बलकवडी : 2.17 टीएमसी (53.19%)
कण्हेर : 6.29 टीएमसी (62.28%)
उरमोडी : 4.50 टीएमसी (45.18%)
तारळी : 1.73 टीएमसी (29.57%)