पुरवठा निरीक्षकास एक दिवस न्यायालयीन कोठडी
स्वस्त धान्य दुकानाचा मासिक कोटा मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी आणि प्रत्यक्ष स्वीकार केला या प्रकरणात माण तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मेघराज बाळासाहेब जाधव (वय ३५, रा. वडूज, ता. खटाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले.
सातारा : स्वस्त धान्य दुकानाचा मासिक कोटा मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी आणि प्रत्यक्ष स्वीकार केला या प्रकरणात माण तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मेघराज बाळासाहेब जाधव (वय ३५, रा. वडूज, ता. खटाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले. बुधवारी जिल्हा न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
तक्रारदाराच्या स्वस्त धान्य दुकानाचा नोव्हेंबर महिन्याचा धान्य कोटा मंजूर करून देण्यासाठी जाधव यांनी ३ हजार ७०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ३ हजार ५०० रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली.
या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी जाधव यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.