भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;
सातारा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे गेले आहेत.
सातारा : सातारा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे गेले आहेत. या बिघाडामुळे पश्चिम भागातील अनेक परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होत असून नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
सततच्या पावसामुळे डोंगर उतारावरील माती जलवाहिनीवर कोसळल्याने पाइपलाइनवर मोठा दाब निर्माण झाला. परिणामी जलवाहिनीला तडे जाऊन मोठ्या प्रमाणात पाणी गळू लागले. घटनेची माहिती मिळताच सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले.
दुरुस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. मुसळधार पाऊस, चिखल आणि जलवाहिनीतून होणारी सततची गळती यामुळे कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे विशेष तांत्रिक कौशल्याची आवश्यकता भासल्याने पुण्यातील आयात इंजिनिअरिंग कंपनीच्या पाच सदस्यीय तज्ज्ञ पथकाला साताऱ्यात पाचारण करण्यात आले आहे. हे पथक जलवाहिनीतील तडे वेल्डिंग करून पाइप पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे.
पालिकेचे अभियंता शहाजी वाठारे तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी दिवसभराची शासकीय कामे पूर्ण करून रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून दुरुस्तीवर लक्ष ठेवत आहेत. जलवाहिनी पूर्ववत होईपर्यंत संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
या बिघाडाचा परिणाम पावर हाऊस, खाण टाकी, कात्रेवाडा आणि गणेश टाकी या जलसाठ्यांवर झाला असून तेथे अपेक्षित प्रमाणात पाणी पोहोचत नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गुरुवारीही शहराच्या पश्चिम भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नगरपालिकेकडून गेल्या दोन दिवसांत १०२ टँकर फेऱ्या करण्यात आल्या आहेत. एक्सप्रेस लाईनवरूनही नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत असला तरी मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी पडत आहे.
मुख्याधिकारी विनोद जळक यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत, दुरुस्तीचे काम शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.