खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र
खेड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अपहार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, ग्रामस्थ व काही माजी पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
सातारा : खेड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अपहार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, ग्रामस्थ व काही माजी पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद कदम, माजी सरपंच सुजीत पवार, पिंटू गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव व सुमित भोसले यांनी खेड ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केला. विभागीय आयुक्तांनी सरपंच लता फरांदे यांना अपात्र ठरविल्यानंतरही संबंधितांना राजकीय पाठबळ दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ग्रामपंचायतीच्या विविध कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त स्तरावरील चौकशीत काही कामांबाबत आर्थिक अपहाराचे निष्कर्ष नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित सदस्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जनतेसमोर पुन्हा जाण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार महेश शिंदे यांनी खेड परिसरातील विकासकामांबाबत केलेल्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून झालेल्या काही कामांची बिले ग्रामपंचायतीतून काढल्याचा आरोप करत संबंधित कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच विकासकामे, निधी खर्च आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत सार्वजनिक चर्चेसाठी आपण तयार असल्याचे आव्हानही त्यांनी दिले.
खेड ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहार, विकासकामांची गुणवत्ता आणि प्रशासनिक निर्णय यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, या आरोपांबाबत आमदार महेश शिंदे किंवा संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.