केंद्र शासनाच्या विकास योजना आणि राज्यातील महायुती सरकारच्या राजकीय रणनीतीमुळे सातारा जिल्ह्यात महायुतीच्या आठही उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे.
सातारा : केंद्र शासनाच्या विकास योजना आणि राज्यातील महायुती सरकारच्या राजकीय रणनीतीमुळे सातारा जिल्ह्यात महायुतीच्या आठही उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. याचे राजकीय श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात 128 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करावे, अशी आग्रहाची मागणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.
सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या घवघवीत यशानंतर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, राज्य कार्यकारणी सदस्य दत्ताजी थोरात इत्यादी यावेळी उपस्थित होते.
कदम पुढे म्हणाले, केंद्र शासनाने संपूर्ण देशात राबवलेल्या विकास योजना या सर्वसामान्यांसाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत. राज्यातही महायुती शासनाने राबवलेली लाडकी बहीण योजना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे राज्यात भारतीय जनता पार्टीला 128 जागा मिळाल्या. हे घवघवीत यश सर्वसामान्यांसाठी विकास योजना राबवल्यामुळेच मिळाले आहे. या यशामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रमुख मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे, अशी जिल्हा कार्यकारिणीची धारणा आहे.
सातारा जिल्ह्यातही महायुतीने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे येत्या पंधरवड्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सोयीस्कर वेळापत्रकाप्रमाणे सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदारांचा भव्य जाहीर सत्कार करण्याचे नियोजन ठरले आहे. त्याकरता भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीमध्ये त्याचे नियोजन केले जाणार आहे. ही बैठक खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाणार आहे. महायुतीच्या सर्व आमदारांचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.