तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळामुळे (Cyclone Fengal) जोरदार पाऊस पडत आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे तिरुवन्नमलाई येथील घरांवर सुमारे ४० टन वजनाचा मोठा दगड कोसळल्याने ५ मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
तामिळनाडू : तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळामुळे (Cyclone Fengal) जोरदार पाऊस पडत आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे तिरुवन्नमलाई येथील घरांवर सुमारे ४० टन वजनाचा मोठा दगड कोसळल्याने ५ मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तामिळनाडूतील (Tamil Nadu) तिरुवन्नमलाई येथे एका टेकडीवरून भूस्खलन झाले. माती, दगडांचे ढिगारेच्या ढिगारे कोसळलेच; पण सुमारे ४० टन वजनाचा एक पाषाणही डोंगरावरून खाली आला आणि खालील व्हीयूसी नगर परिसरात रस्त्यावर असलेल्या घरांवर पडला. त्यामुळे दोन घरे भुईसपाट झाली. ढिगाऱ्याखाली ७ जण बेपत्ता झाले होते. त्यातील कुणीही जिवंत राहिलेले नाही. ढिगारे हटवले जात आहेत आणि हायड्रोलिक लिफ्टने खडक हटवण्याचा प्रयत्नही एनडीआरएफकडून सुरूच आहे.
कृष्णगिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बस, कार वाहून गेल्या
तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील उथंगराई बसस्थानकालगत रस्त्याच्या कडेला एका बससह उभी असलेली इतर वाहने पुरात वाहून गेली. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक नदी, नाल्यांना पूर आलेले आहेत.
उत्तर तामिळनाडूला मुसळधार पावसाचा तडाखा
शनिवारी चेन्नईजवळ धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने हाहाकार उडाला आहे. विशेषतः उत्तर तामिळनाडूला मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे विलुप्पुरम जिल्ह्यात पूर आला आहे. येथील अनेक पूल वाहून गेले आहेत. गावांशी संपर्क तुटला आहे. शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या भागातील रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सोमवारी धर्मपुरी जिल्ह्याला भेट दिली होती. त्यांनी आपत्तीमुळे बाधित कामगार आणि रहिवाशांशी संवाद साधला.