काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज (दि.२८) लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी परिधान करून आणि हातात संविधानाची प्रत घेऊन त्या सभागृहात दाखल झाल्या होत्या.
दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज (दि.२८) लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी परिधान करून आणि हातात संविधानाची प्रत घेऊन त्या सभागृहात दाखल झाल्या होत्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले रविंद्र चव्हाण यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
प्रियांका गांधी वाड्रा वायनाडमधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्यांना 6.22 लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सत्यन मोकेरी यांच्यापेक्षा त्यांना 4 लाखांहून अधिक आणि भाजपच्या नव्या हरिदास यांच्यापेक्षा 5.12 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. संसदेतील गांधी घराण्यातील त्या तिसऱ्या सदस्या ठरल्या आहेत. त्यांची आई सोनिया गांधी या राजस्थानमधून पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत. तर भाऊ राहुल गांधी रायबरेलीमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत.