लोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्धाराची आठवण नागरिकांना होण्यासाठी सातारा शहरात आजपासून सलग तीन दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत संविधानाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
सातारा : लोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्धाराची आठवण नागरिकांना होण्यासाठी सातारा शहरात आजपासून सलग तीन दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत संविधानाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुरू आहे. राष्ट्रीयता जागर अभियानच्या माध्यमातून हे उपोषण सुरू करण्यात आलेले आहे.
मागील दीर्घ काळापासून भारतीय घटनेतील मूल्य आणि लोकशाही गणराज्य पद्धतशीरपणे नेस्तनाबुत करायचं काम राज्य संस्थेकडून सुरू आहे. घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर आघात करण्याचे काम काही प्रवृत्ती कडून सुरू आहे. आज या सगळ्याची आठवण जनतेला आणि सरकारला करून देण्याची गरज आहे. म्हणून ज्येष्ठ नेते डॉ बाबा आढाव यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून सातारा येथेही महात्मा फुले यांच्या स्मृती दिनापासून सलग तीन दिवस हे उपोषण करण्यात येणार आहे.
लोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्धाराची आठवण नागरिकांना होण्यासाठी सातारा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात राष्ट्रीयता जागर अभियान यांच्यावतीने आजपासून सलग तीन दिवस उपोषण सुरू राहणार आहे. यामध्ये जयंत उथळे, ममता प्रामाणिक, नाझीम इनामदार, विजय मांडके, दिलीप भोसले, एडवोकेट शैलजा जाधव, एडवोकेट वर्षा देशपांडे, हेमा सोनी, श्रीकांत कांबळे, प्रा.डॉ संजीव बोंडे, सादिकअली बागवान, मिनाज सय्यद, एडवोकेट मिलिंद पवार, प्रा डॉ अजित गाढवे, चंद्रकांत खंडाईत, कल्पना मोहिते, किरण सांगळे, महेश गुरव व इतरांनी सहभाग घेतला.
उद्या दि. 29 रोजी सकाळी दहा वाजता हे उपोषण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
आज महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपोषण स्थळी महात्मा फुले यांचे अखंड विजय मांडके यांनी सादर केले व ते सामूहिक पणे म्हटले गेले.