आनेवाडी टोलनाक्यानजीक झालेल्या भीषण अपघातात वाई तालुक्यातील विरमाडे येथील सैन्य दलात असलेल्या विजय श्रीरंग सोनावणे (वय 37) या जवानाचा मृत्यू झाला.
वाई : आनेवाडी टोलनाक्यानजीक झालेल्या भीषण अपघातात वाई तालुक्यातील विरमाडे येथील सैन्य दलात असलेल्या विजय श्रीरंग सोनावणे (वय 37) या जवानाचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, इंडियन तिबेट पोलीस दलात कार्यरत असणारे विरमाडे येथील विजय सोनावणे हे सध्या सुट्टीवर आले होते. सातारा शहरातील तामजाईनगर परिसरातील श्रीनगरी सोसायटीमध्ये ते आपल्या कुटुंबियांसमवेत वास्तव्यास होते. मंगळवारी ते आपल्या मुळ गावी विरमाडे येथे गेले होते. विरमाडे येथील एका सार्वजनिक मंडळाच्या गणपतीची मंगळवारी विसर्जन मिरवणूक असल्याने ते रात्री उशिरापर्यंत मिरवणूक पाहण्यासाठी थांबले होते. रात्री उशिरा ते पुन्हा आपल्या दुचाकीवरुन (बुलेट) सातारला निघाले होते. महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर आले असता अंधारामुळे महामार्गावर उभा असलेला ट्रक त्यांच्या निदर्शनास न आल्याने त्यांची दुचाकी ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, बुलटेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच विजय सोनावणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते महामार्गावरच बेशुद्ध अवस्थेत पडले. अपघातानंतर तात्काळ त्याठिकाणी उपस्थित असलेल्या विरमाडे येथील तरुणांनी त्यांना सातारा येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विजय सोनावणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडिल व दोन बहिणी असा परिवार आहे. विजय सोनावणे यांच्या अपघाती निधनाने विरमाडेसह परिसरात शोककळा पसरली आहे.