सालाबाद प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला श्री दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा केला जातो. शनिवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर हा दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरातून ..अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा..च्या जयघोषात साजरा करण्यात आला.
सातारा : सालाबाद प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला श्री दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा केला जातो. शनिवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर हा दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरातून ..अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा..च्या जयघोषात साजरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात या दत्त जयंती सोहळ्या अगोदर सात दिवस दत्तात्रय भगवानाचे चरित्र अर्थात श्री गुरुचरित्र पठण पारायण स्वरूपात घरोघरी तसेच सामुदायिक रीतीने करण्याची प्रथा आहे.
मागील रविवारपासून या गुरुचरित्र वाचन पारायण सोहळ्यात सुरुवात झाली, व आज या सप्ताहाची सांगता दत्तजन्माने करण्यात आली. सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील श्री मुतालिक दत्त मंदिरात यानिमित्त तीन दिवसांचा दत्तजन्म उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. आज सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर सहा वाजून दोन मिनिटांनी दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिराला विविध आकर्षक फुलांची तसेच केळीचे आणि नारळाच्या पानांची सजावट करण्यात आली आहे.
मंदिरातील संगमरवरी दत्तमूर्तीला अतिशय सुरेख असे गुलाब आणि शेवंती पुष्पांचे हार घालून फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर साबुदाणा खिचडी चा प्रसाद हातात वितरण करण्यात येत होता. भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
या मंदिरात रविवारी सायंकाळी दत्त गाभाऱ्या पुढे अर्पित नृत्यालय यांचे वतीने नंदिता देशपांडे व सहकालाकारांचे कथक नृत्य सादर केले जाणार आहे. त्यापूर्वी जयंती उत्सवानिमित्त अकरा ब्रह्मावृंदांच्या उपस्थितीत मंत्र जागर आणि मंत्र पठण करण्यात आले. आज दिवसभर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिराला विशेष रूप प्राप्त झाले होते. मंदिराच्या पुढे आकर्षक सजावट आणि कमान स्वागतासाठी बांधण्यात आली होती.
सातारा शहरातील माची पेठेतील टोपे मामा दत्त मंदिर, पोलीस केंद्र पुढील आनंदवाडी दत्त मंदिर तसेच संगमनगर आणि शहरातील विविध मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात सायंकाळी संपन्न झाला.
गेंडामाळ शाहूपुरी परिसरातील श्री दत्त भक्त मंडळाचे वतीने तीन दिवसांचा विविध कार्यक्रम आयोजित केला असून यामध्ये भजन, प्रवचन, कीर्तन, दत्त जन्मकाळ साजरा करण्यात आला. सातारा जिल्हा नजीकच्या श्रीक्षेत्र नारायणपूर येथेही दत्तभक्तांनी एकमुखी दत्त मंदिरात हा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला. सातारा येथून खास दत्त जयंती निमित्त अक्कलकोट गाणगापूर, नरसोबाची वाडी, नारायणपूर, श्रीक्षेत्र गोंदावले येथे विशेष एसटी बसेस भक्तांच्या सोयीसाठी सोडण्यात आल्या होत्या.
सायंकाळी दत्तजन्म सोहळा झाल्यावर महाआरती होऊन प्रसाद वितरण करण्यात आला. अनेक दत्त मंदिरात यानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील विविध एसटी आगारात असलेल्या श्री दत्त मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी विशेष वर्गणी काढून येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते.
सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव सोमवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. यानिमित्त गोंदावले येथील दत्त मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील श्री ढाळे परिवाराच्या दत्त मंदिरातही मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. भजन, कीर्तन, प्रवचन, अखंड जागर आणि दत्तधुन तसेच दत्त स्मरण करणारी भावगीते भक्ती गीते म्हणत दत्तभक्तांनी हा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला.
दत्त जयंतीच्या अनुषंगाने सातारा बस स्थानक परिसरातील दत्त मंदिरातही सालाबाद प्रमाणे महाप्रसादाचे आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रिक्षा चालक-मालकांसह प्रवाशांनीही रक्तदान करून समाजसेवेमध्ये आपला खारीचा वाटा उचलला.