कर्मवीर भाऊराव पाटील, सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (घटक महाविद्यालय) मधील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दि. २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी भारतीय 'संविधान दिना'चे आयोजन करण्यात आले.
सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील, सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (घटक महाविद्यालय) मधील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दि. २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी भारतीय 'संविधान दिना'चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा. अॅड. राजेंद्र गलांडे, सातारा यांनी 'भारतीय राज्यघटनेची अमृत महोत्सवी वाटचाल' याविषयावर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, साताराचे कुलगुरू मा. प्रा. डी. ज्ञानदेव म्हस्के होते,
राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. शिवाजी पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्याचा परिचय करून दिला. यानंतर एन. एस. एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महादेव चिंदे यांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन केले. मा. अॅड. राजेंद्र गलांडे, सातारा 'भारतीय राज्यघटनेची अमृत महोत्सवी वाटचाल' याविषयावर बोलताना म्हणाले की, भारतीय नागरिकांनी विद्यमान परिस्थितीत संविधानाची मूल्ये समजून घेतली पाहिजेत आणि लोकशाहीची मुल्ये सर्व सामन्यांच्या जीवनात रुजविणे आवश्यक आहे. पुढे ते असेही म्हणाले की, सामाजिक न्याय व समता यांचा विचार करून न्यायाची भूमिका लक्षात घेऊन भारतीय संविधानात कायदे करण्यात आले. शोषितांच्या न्यायासाठी विविध कायद्यांची तरतूद संविधानात केलेली आहे. त्यामुळेच समतेचा न्याय हा राज्यघटनेचा महत्वपूर्ण घटक आहे. संविधानाने भारतीय नागरिकांना जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. भारतीय राज्यघटनेमुळेच स्त्रिया, आदिवासी इत्यादी बंचिताना अधिकार मिळाले आहेत. मा. कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात संविधानाची उद्देशिका ही सर्व भारतीय नागरिकांना एकत्रित आणणारी आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हाच भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. घटनेतील कायदा ही व्यापक संकल्पना असलेली दिसते. त्यामुळे संविधानाचे कायदे, नियम व न्यायाची सीमारेषा समजून घेणे महत्वाचे आहे. भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल गौरवशाली आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी मा. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेंकुदळे, सहसचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा, मा. डॉ. राजेंद्र मोरे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा तथा सहसचिव, (ऑडिट विभाग) रयत शिक्षण संस्था, सातारा, मा. डॉ. विजय कुंभार, प्र. कुलसचिव, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा आणि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए.के. वावरे आणि डॉ. आर. आर. साळुंखे, एन. एस. एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.नवनाथ इप्पर, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. निळकंठ लोखंडे यांनी मानले. तर सूत्रसंचालन मराठी विभागातील प्राध्यापक तथा एन. एस. एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्या नावडकर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.