पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेचे दवाखाने सध्या अपुरे पडत आहेत. महापालिकेच्या सध्या सुरू असलेल्या 29 दवाखान्यांमध्ये प्रामुख्याने बाह्यरुग्ण विभागाची पुरेशी सोय आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेचे दवाखाने सध्या अपुरे पडत आहेत. महापालिकेच्या सध्या सुरू असलेल्या 29 दवाखान्यांमध्ये प्रामुख्याने बाह्यरुग्ण विभागाची पुरेशी सोय आहे. मात्र, या ठिकाणी आंतररुग्ण पेशंटसाठी स्वतंत्र विभाग किंवा पुरेशा खाटांची सोय नाही. त्यामुळे ज्या रुग्णांना उपचारासाठी आंतररुग्ण विभागाची गरज असते, त्यांना महापालिकेच्या नऊ रुग्णालयांकडेच धाव घ्यावी लागत आहे. शहरामध्ये गेल्या दहा वर्षात लोकसंख्येत भरमसाट वाढ झाली आहे. शहराची लोकसंख्या सध्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांची (दवाखाने) संख्या 29 इतकीच मर्यादित राहिली आहे. ही संख्या वाढविण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्याअंतर्गत शहरात 70 ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन केली जाणार आहेत. मात्र, त्यासाठी अद्याप जागा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे नव्या जागांचा शोध घेऊन या कामाला गती द्यावी लागणार आहे.
महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये देण्यात येणार्या वैद्यकीय सुविधा सध्या अपुर्या पडत आहेत. त्यामुळे विविध आजारांवरील उपचारासाठी रुग्णांना महापालिकेच्या प्रमुख 9 रुग्णालयांवरच विसंबून रहावे लागत आहे. तर, पिंपरी-अजमेरा कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात डोळ्यांच्या आजारांवरील विविध शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी जावे लागते. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये सध्या केवळ बाह्यरुग्ण विभागाचीच सुविधा उपलब्ध आहे. त्यातही बाह्यरुग्ण विभागांमध्ये काही तज्ज्ञ डॉक्टर आठवड्यातून एकदा तर, काही डॉक्टर महिन्यातून एकदाच उपलब्ध असतात. त्याशिवाय, दवाखान्यांतील बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणार्या रुग्णांना बसण्यासाठीदेखील जागा अपुरी पडत आहे.
दवाखान्यामध्ये रुग्णांना फक्त बाह्यरुग्ण विभागातील उपचार मिळू शकतात, अशी संकल्पना रुजली आहे. रुग्णांवर शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचार करायचे असतील, तर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतरच उपचार करणे शक्य होत आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेने उभारलेल्या रुग्णालयांची संख्या कमी आहे. सध्या 9 रुग्णालये सुरू आहेत. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक गावामध्ये एक दवाखाना असायला हवा. तसेच, या दवाखान्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा रुग्ण आणि नातेवाईकांची आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने हाती घेतलेल्या शहर आरोग्य कृती आराखड्यास अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे कार्यवाहीचा मसुदा कागदावरच राहिला आहे. आरोग्य कृती आराखडा तयार होऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास, शहरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, स्थानिक पातळीवर मुलभूत आरोग्य सुविधा देण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. दरम्यान, याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.