वाई तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने त्याचा रब्बी हंगामातील पेरणीवर विपरीत परिणाम झालेला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. मात्र, परतीच्या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिकांच्या पेरणी कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्यः स्थितीत तालुक्यात 50 टक्के पिकांचा पेरा झाला आहे.
वाई : वाई तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने त्याचा रब्बी हंगामातील पेरणीवर विपरीत परिणाम झालेला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. मात्र, परतीच्या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिकांच्या पेरणी कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्यः स्थितीत तालुक्यात 50 टक्के पिकांचा पेरा झाला आहे. यामध्ये ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली असून कडधान्यांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र, त्या तुलनेत गव्हाची पेरणी कमी झाल्याचे चित्र आहे. सध्या गहू 32 टक्के, ज्वारी 60 टक्के, हरबरा 40 टक्के आणि कडधान्यांचा 70 टक्के पेरा झाला आहे. सरासरी तालुक्यात 50 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी मशागतीची कामे जोमात असून बळीराजा शेतात राबताना दिसत आहे. मात्र, अनेक भागात मजुरांचा तुटवडा भासत असल्याने यंत्रांची धडधड वाढली आहे.
निसर्गाचा लहरीपणा बळीराजाच्या मुळावर उठल्याचे चित्र वाई तालुक्यात दिसत आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामात बळीराजाचे नुकसान झाले. तसेच रब्बी हंगामात पेरण्या करण्यात मात्र अडचणी येताना दिसत आहेत. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतातून पाणीच बाहेर निघत नाही. ज्वारी व गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यातील बळीराजा रब्बी हंगाम यशस्वीतेसाठी कंबर कसलेला दिसत असून शेतातील कामात व्यस्त आहे. वाई तालुक्यातील तीनही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. यामुळे या वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. वाई तालुक्यातील सर्व प्रकारचे बंधारे, तलाव, बलकवडी, नागेवाडी व धोम धरणात पाण्याचा पुरेसा साठा साठलेला आहे. तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, मोठ्या प्रमाणात केली जाते. तालुक्यातील 70 टक्के क्षेत्रावर गहू, ज्वारी व हरबरा व इतर कडधान्याची पेरणी केली जाते. तर तालुक्याचे अर्थकारण 30 टक्के टक्के असणार्या ऊस, हळद, आले या बागायती पिकांवर अवलंबून असते.
भात पिकांवर अवलंबून असलेला शेतकरी अडचणीत आलेला आहे. अगोदर खरिपाला फटका बसला असताना रब्बीतही अडचणी येऊ लागल्या आहेत. पावसामुळे बागायती क्षेत्र धोक्यात येऊन उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. पालेभाज्या खराब झाल्याने बाजारात त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीत शेतकर्यांच्या हाती काहीही न लागल्याने बळीराजाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी हंगामातील काही ठिकाणी अतिपावसामुळे बियाणाची उगवण योग्य पद्धतीने न झाल्यास दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.