जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. हवामानात बदल होत असून, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. पावसाची शक्यता व ढगाळ हवामान यामुळे रब्बीतील कांदा, गहू, ज्वारी तसेच बारमाही हळद, आले आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
सातारा : जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. हवामानात बदल होत असून, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. पावसाची शक्यता व ढगाळ हवामान यामुळे रब्बीतील कांदा, गहू, ज्वारी तसेच बारमाही हळद, आले आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
उत्तर भारतात सक्रिय झालेला पश्चिमी चक्रवात शमल्याने तिकडून येणार्या शीतलहरींच्या प्रभावामुळे जिल्ह्यासह राज्यात मागील चार दिवस थंडीची लाट होती. मात्र, अचानक दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळ शांत झाले असले तरी त्याचा परिणाम वातावरणावर जाणवत आहे. सोमवारी सातार्याचे किमान तापमान 21.5 तर महाबळेश्वरचे किमान तापमान 16.4 अंश होते. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशात ढगाळ हवामानामुळेअवकाळी पावसाची शक्यता आणखी दाट झाली आहे.
दरम्यान, थंडी रब्बीतील पिकांना पोषक ठरत असले तरी ढगाळ हवामानामुळे मात्र पिकांवर रोगराईचा प्रादुभाव वाढतो. सध्या गहू, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी आदि पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून पिके जोमात आली आहेत. कांद्याच्या रोपांचे तरवे तयार आहेत. काही ठिकाणी कांदा लागण सुरु आहे तर काही ठिकाणी पेरणी केलेला कांदा उगवून जोर धरु लागला आहे. पहाटे पडणारे धुके झाडण्यासाठी कांदा उत्पादकांची धांदल उडत आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून वातावरणाचा नूर पालटला असून ढगाळ हवामान राहत आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पाती करपणे, गहू, ज्वारीवरीची पानेदेखील पिवळी पडतात. तर मिरच्या, पालेभाज्यांवर तुडतुडी, पाने खाणार्या आळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने कीडनाशकांच्या फवारणीचा खर्च वाढणार आहे.
ऊस उत्पादकांची चिंता वाढणार
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असला, तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा एक ते दीड महिना उशिरा ऊसतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आडसाली ऊस तुटण्यास आधीच उशीर झाला आहे. अशात अवकाळी पाऊस झाला, तर तोडणी आणखी लांबणार आहे. शिवाय, तोडलेला ऊस रस्त्यावर काढण्यासाठी वाहतुकीचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. आधीच दीड वर्ष पीक शेतात अन् त्यात आस्मानी संकट ओढवण्याच्या शक्यतेने ऊस उत्पादकांची चिंता वाढणार आहे.