पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. चांगल्या व वाईट गोष्टींचे प्रतिबिंब पत्रकारितेतून दिसून येते. त्यामुळे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नेहमीच चर्चेत असतो. सातार्यातील युवा पत्रकार पलाश जवळकर यांनी बातमीपेक्षाही माणुसकी दाखवून एका व्यक्तीचे प्राण वाचविले. या अतुलनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांनीच युवा पत्रकार पलाश जवळकर यांचा सन्मान केला.
आदर्श पत्रकार हा कौतुकास पात्र असतो. सातारा शहरातील फुटका तलावनजिक पलाश जवळकर हे दि. 9 रोजी 2.50 च्या सुमारास मित्रासमवेत फुटका तलाव येथून काही कामानिमित्त जात असताना एका व्यक्तीने आत्महत्त्या करण्यासाठी फुटका तलावात उडी मारली. त्यावेळी ही घटना पाहणारी एक महिला तेथे पोहोचून मदतीसाठी टाहो फोडत होती. हे दृश्य पाहताच पलाश जवळकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता मित्राकडे मोबाईल आणि पाकिट देत पाण्यामध्ये उडी मारली. दरम्यान, तेथे बघ्यांची गर्दीही झाली होती. मात्र, तिकडे लक्ष न देता पलाश जवळकर यांनी मोठ्या हिकमतीने संबंधिताला काठावर आणून त्याचे प्राण वाचवले. यानंतर संबंधिताची माहिती घेतली असता त्याचे नाव सतीश शिवलिंग स्वामी वय 54, रा. शाहूपुरी, सातारा असे असल्याचे समजले. यानंतर संबंधिताच्या नातेवाईकांना कळवून याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. यानंतर संबंधिताला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
एक जीव वाचविल्याबद्दल पत्रकार पलाश जवळकर हे निश्चितच कौतुकास पात्र आहेत. कारण आत्ताच्या जमान्यात कोणी दुर्घटनाग्रस्त झाल्यास त्याचा लाईव्ह व्हिडिओ करण्यात मश्गुल असणारा समाज हा आपण पाहतो. मात्र, कोणत्याही प्रसंगाचा विचार न करता पलाश जवळकर यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचवून जो आदर्श निर्माण केला आहे, तो नक्कीच इतरांनीही घेण्यासारखा आहे, असे गौरवोद्गार यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी काढले.
यावेळी उमेश बांबरे, संदीप राक्षे, दीपक देशमुख, ज्ञानेश्वर भोईटे, प्रमोद इंगळे, विनित जवळकर, वैभव बोडके, संतोष शिराळकर, महेश पवार, तन्मय पाटील, रिजवान सय्यद, जावेद खान, स्वप्निल गव्हाळे, निलेश रसाळ, नितीन काळेल, हरिदास जगदाळे, निखिल मोरे, कैलास मायने, संदीप शिंदे, दत्ता पवार, सुरेश बोतालजी, विशाल कदम, महेश चव्हाण, किरण मोहिते, सचिन सापते, प्रकाश वायदंडे आदी मान्यवरांनी पलाश जवळकर यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.