सातारा जिल्ह्याचे मुरब्बी व कसलेले राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे फलटणचे राजे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सातारा जिल्ह्याचे मुरब्बी व कसलेले राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे फलटणचे राजे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राजकारण सापेक्ष मुरब्बी धोरणे करून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणारे रामराजे तालुक्याच्या राजकारणात आणि जिल्ह्याच्या राजकारणात सध्या विमनस्क अवस्थेत आहेत की काय याच्या चर्चा यानिमित्ताने जिल्हाभरात झू लागल्या आहेत.
फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी साथ सोडल्यानंतर रामराजेंची दोन्ही राष्ट्रवादीला साथ घालणारी डबल ढोलकी फलटणच्या राजकीय रंगमंचावर वाजू लागल्याने फलटण नरेशांच्या मनात नक्कीच चालले तरी काय, हा प्रश्न समोर आला आहे. फलटणचे नेते, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर विशेषतः सेवा सोसायटी, सहकार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथील राजकारणावर असलेली पकड वादातीत आहे.
याआधी पहायचे झाले तर राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्याशी असलेले सख्य आणि अजितदादा पवारांशी असलेला राजकीय दुरावा असा दुहेरी मामला असताना रामराजे हे दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या जोडीने जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड ठेवून होते. जिल्ह्याच्या राजकारणातला कोणताही कळीचा निर्णय रामराजेंच्या निर्णयाशिवाय होत नसे. मात्र आता भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर व जयकुमार गोरे यांच्या विषयी असणार्या तक्रारीची दखल न घेतल्यास या पुढील काळात तुतारी हातात घेऊ, असा थेट इशारा विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीआधी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये सारेच काही अलबेल आहे असे नाही. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण फलटण तालुक्यात पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मध्ये भाजपचे समरजित घाडगे शरद पवार गटाची तुतारी हातात घेत असताना त्यानंतर फलटणमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता सुरू झाल्याने आणि तसेच सूचक वक्तव्य स्वतः रामराजे यांनी केल्याने अजितदादा पवार यांना स्वतः फलटणमध्ये येऊन डॅमेज कंट्रोल करावे लागले. उभय नेत्यांच्या चर्चेमध्ये बंद दाराआड काय खलबते झाली, याची दिवसभर फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू होती. गल्लोगल्ली दहशत करणार्या रणजीत सिंह नाईक निंबाळकर व त्यांची सोबत करणार्या आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी आमची तक्रार आहे. त्यांच्या भारतीय जनता पार्टीला साथ देऊ नका, अन्यथा आम्ही तुतारी हातात घेऊ, अशा इशार्यामुळे अजित दादांना थेट फलटणमध्ये जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घ्यावी लागली.
जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सोयीप्रमाणे सत्ता आणि आपण म्हणेल ती राजकारणाची दिशा त्याचबरोबर कायम सत्तेत राहण्यामध्ये लागणारी राजकीय हातोटी अशा विविध गुणांच्या जोरावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी गेल्या तीन दशकांमध्ये जिल्ह्याचे राजकारण एका वेगळ्या वळचणीने हाताळलेले आहे. रामराजेंच्या निर्णयांमध्ये बारामतीकरांचा मोठा प्रभाव असतो. फलटणच्या हक्काचे पाणी बारामतीला पळवले जाणे हा झालेला आरोप, जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये संचालक मंडळावर कोणाचा प्रभाव ठेवायचा, कोणाचा पत्ता कट करायचा अशा विविध बारीक-सारीक नाजूक मुद्द्यांमध्ये रामराजे यांनी धोरणात्मक पद्धतीने राजकारण करत आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे धोरण ठेवले होते.
मात्र अलीकडच्या दशकभरामध्ये बरेचसे पाणी पुलाखालून वाहून गेलेले आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामराजेंच्या भाजप प्रवेशाच्या मोठ्या वावड्या उठल्या होत्या. तशी राजकीय चाचपणी सुद्धा रामराजे यांनी केली होती. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाणे रामराजेंनी टाळले होते मात्र शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्या पावसातील सभेला रामराजेंनी ऐनवेळी उपस्थिती लावली नाही. त्यावेळी रामराजेंची असलेली अनुपस्थिती याची स्वतः शरद पवारांनी गंभीर दखल घेतली होती.
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या नाट्यमय प्रयोगांतर पुढील अडीच वर्षात राज्यामध्ये महायुतीने भूकंप घडवला. त्यामध्ये राष्ट्रवादीची दोन शकले झाली. अजितदादा पवार यांचा गट महायुतीत जाऊन मिळाला त्यावेळी सुद्धा जे राजकीय बंड झाले त्यामध्ये सत्तेचा रस्ता कुठून जातो हे पक्के ठाऊक असलेल्या रामराजे यांनी अजितदादा गटाला पसंती दिली. ज्या अजितदादांशी राजकीय मतभेद राहिले, त्यांच्याशीच गुळपीठ जमवून रामराजेंनी पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकीय केंद्रस्थानी आपण आहोत, हे दाखवून दिले. मात्र अलीकडच्या काळामध्ये फलटण तालुक्याच्या राजकारणात रामराजेंना सातत्याने बॅकफूटवर जावे लागले आहे. रामराजे गटाचे कट्टर कोळकी गटातील व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या भाजप प्रवेशाने राजे गटाला खिंडार पडले. याची तालुक्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली. सोनवलकर यांनी रामराजे यांच्या गटातून बाहेर पडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात प्रवेश केला. माजी उपसभापती संजय सोडमिसे, संजय कापसे, संतकृपा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विलासराव नलवडे, माजी नगरसेवक अजय माळवे, युवा नेते सुधीर अहिवळे यांच्यासह फलटण तालुक्यातील विविध गावच्या सरपंचांनी राजे गटाला राम राम ठोकल्याने रामराजेंचा फलटण तालुक्यातील जादुई करिष्मा ओसरला की काय, अशी चर्चा फलटणच्या राजकीय पारावर रंगू लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी फलटण मध्ये येऊन फलटणचा आगामी आमदार भाजपचाच होणार, असे सांगत खुले आव्हान राजे गटाला दिले आहे. यावरून महायुतीमध्ये नक्कीच आलबेल नाही, हे समोर आले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी उघड-उघड बंड करत राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे फलटणच्या राजकारणात भाजपला हा तिढा सोडवताना विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिशय नाजूकपणे प्रश्न हाताळावा लागणार आहे.
आधी अजितदादांचे घड्याळ आणि आता शरदचंद्र पवार गटाची तुतारी असा राजकीय फुलबाजा उडवत रामराजेंनी स्वतःला पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. पण सत्तेच्या राजकारणामध्ये राजकीय धरसोड वृत्ती कधीकधी त्रासदायक ठरू शकते, याचा निश्चित अंदाज रामराजे यांना असणार आहे. तालुक्याच्या राजकारणात मध्ये भाजपने अंतर्गत सुरू केलेला चंचू प्रवेश, कार्यकर्त्यांची वाढती फळी आणि राजे गटाचा घटत चाललेला प्रभाव याची सुरू झालेली चर्चा यामुळे फलटण नरेश राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहेत. त्यामुळेच उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी अशी राजकीय विधाने समोर येत असल्याचे राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करत आहेत. ही राजकीय विमनस्कता, की दबाव तंत्र? मात्र याचे प्रत्यक्ष परिणाम फलटण विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसणार आहेत. राजे गटाला तालुक्याच्या राजकारणातील वाढता विरोध ही सुद्धा नाण्याची दुसरी बाजू तपासून घ्यावी लागेल. रामराजे नाईक निंबाळकर हे मुरब्बी राजकारणी नेते आहेत. सातारा जिल्ह्यातील राजे गटाला बांधून ठेवण्यामध्ये ते कायमच यशस्वी ठरले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील राजे गटाचे सीनियर म्हणवले जाणारे रामराजे सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही डगरीवर हात ठेवून नक्की कोणती पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्न करीत आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राजे गटाचाच आमदार निवडून आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांना विशेषत: तालुक्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाला त्यांचा उघड विरोध राहिला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना राष्ट्रवादीला दगा फटका होऊ नये याकरता फलटणमध्ये येऊन रामराजे यांच्याशी चर्चा करावी लागली, हा दबाव गटाचा सुद्धा दुसरा भाग असू शकतो. पण अजितदादा काय किंवा शरद पवार काय, पवारकाका पुणे महाराष्ट्राच्या राजकारणात पक्के मुरब्बी आणि मुरलेले आहेत आणि रामराजे सुद्धा यांचे राजकारण मुरब्बीपणामध्ये कुठेही कमी नाही. मात्र राजकारणात वारंवार दबाव गटाचा इशारा देत राहिल्यास पुढे दबावाच्या राजकारणाचा धाक उरत नाही, हे सुद्धा फलटण नरेशांना आता उमगायला हवे. फलटणच्या राजकारणाची ही दोलायमान स्थिती संतुलित करण्यासाठी सध्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा चेहरा पुढे आणला जात आहे. मात्र त्यांच्या बांधणीमध्ये राम राजेंची राजकीय सफाईदार बांधणी सध्या जाणवत नसल्यामुळे फलटण नरेश यांची राजकीय अस्वस्थता राजकीय विश्लेषकांच्या डोळ्याला उघडपणे दिसून येत आहे.
फलटण येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीने फलटणमध्ये मोट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र रामराजांची तुतारी साद अजितदादांना निश्चितच अस्वस्थ करून गेली. गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांचा डावा हात असणाऱ्या रामराजेंच्या या विधानाचा जाण्यापूर्वी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न तर नाही ना? कारण राजकारणामध्ये जर तर या शक्यता बोलायच्या नसतात. राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम नाही. वातावरण निर्मिती करून राष्ट्रवादीच्या घड्याळ गटाला जुळवायचं आणि पवारांच्या तुतारीला साद घालायची, हे फलटण नरेशांचे राजकारण राजकीय विश्लेषकांचा अभ्यासाचा विषय बनला आहे. यापूर्वी रामराजेंचे राजकारण म्हणजे बर्फा खालची नदी असायची. वरवर शांत वाटणारे रामराजे विरोधक टप्प्यात आल्यावर त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर आहेत. मात्र यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दहशतीचे निमित्त करून त्यांना थेट इशारा देणारे आक्रमक रामराजे जिल्ह्याने पहिल्यांदाच अनुभवले आहेत.
-
विनित जवळकर.