राज्य सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निर्णय घेतील. ते जे निर्णय घेतील त्याला माझा व शिवसेनेचा पूर्ण पाठींबा राहणार आहे. त्यामुळे आता किंतु-परंतु हे कोणीही मनामध्ये आणू नये, मी मनमोकळेपणाने काम करणारा मुख्यमंत्री असल्याचे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सातारा : राज्य सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निर्णय घेतील. ते जे निर्णय घेतील त्याला माझा व शिवसेनेचा पूर्ण पाठींबा राहणार आहे. त्यामुळे आता किंतु-परंतु हे कोणीही मनामध्ये आणू नये, मी मनमोकळेपणाने काम करणारा मुख्यमंत्री असल्याचे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, कल्याणकारी योजना राबविण्यात हे सरकार यशस्वी झाल्यामुळे जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुटुंबियासमवेत तीन दिवसांच्या सुट्टीसाठी सातारा जिल्ह्यातील दरे या गावी आले होते. याचवेळी अचानकपणे त्यांची तब्बेत बिघडली होती. या दरम्यान, कोणालाच ते न भेटल्यामुळे अनेक तर्कविर्तक काढण्यात आले. पण आता तब्बेत बरी झाल्यानंतर रविवारी दुपारी २ वाजता दरे येथून मुंबईला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी सामान्य लोकांच्या अडचणी त्यांची दु:खे समजून घेवून काम केले आहे. साहाजिकच्या त्यांच्या त्याच पध्दतीच्या भावना आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून ते माझ्याकडे पाहत आहेत. मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये महायुतीला मिळालेले हे यश हे सर्वाधिक आहे. आता यामध्ये कोणाचाही संभ्रम नकोय. मागील आठवड्यात मी पत्रकाार परिषद घेवून याबाबत स्पष्टही केले आहे.
राज्य सरकार स्थापन होत असताना बऱ्याच बाबींच्या या चर्चा होणार आहेत. लोकांनी आम्हांला निवडून देताना त्यांच्याशी कमिटमेट करण्यात आली आहे. लोकांच्याबरोबरची सामाजिक बांधिलकी आम्हांला जपायची आहे. मला काय मिळाले किंवा काय मिळणार आहे. यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला भरभरुन मिळणार आहे. त्यांनी आमच्यावर मतांचा वर्षाव केलेला आहे. त्यामुळे आता आमच्याकडून त्यांना देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जी कामे थांबवली होती. ती आम्ही वेगाने पुढे नेण्यात यशस्वी झालो आहोत. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, शेतकरी सन्मान योजना या आतापर्यंतच्या इतिहासात कधी न झालेल्या कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीने घेतला आहे. या योजना महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहील्या जातील. आमचा हा अजेंडा विकासाचा होता. सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे सरकार आहे. या निवडणुकीत जनतेने मतांचा वर्षाव करत याची पोहोचपावती आम्हांला दिली आहे. मुलगी जन्मली, लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ आदी योजनां आम्ही ज्यावेळी सुरु केल्या त्यावेळी जनताच म्हणून लागले हे लाडके सरकार आहे. मला या निवडणूकीत पूर्ण विश्वास होता. त्याचा प्रतिबिंब या निवडणुकीत पहायला मिळाले. आतापर्यंतच्या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत आहे. यामधील नेमकी वस्तुस्थिती काय? या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकार स्थापन होत असताना चर्चा या होत असतात. यामध्ये प्रसारमाध्यमात अधिक चर्चा असतात. एकूणच याबद्दल फक्त चर्चाच आहेत. आतापर्यंत गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर एक बैठक झाली आहे. आता त्यानंतर दुसरी बैठक होईल. त्यामध्ये साधक-बाधक चर्चा होवून महाराष्ट्राच्या हितावह निर्णय घेतला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मी शेतकरी कुटुंबातील आहे, म्हणून गावाला येतो. त्यावेळी इथली लोक भेटत असतात. गावच्या मातीतील लोकांच्यामध्ये भेटण्यात एक वेगळाच आनंद आहे. मी ही शेतकरी परिवारातून आलो आहे. आम्ही ज्या योजना केल्या त्याचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये फायदा झाला आहे. त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत पहायला मिळाले आहे. निवडणूक काळात प्रचारादरम्यान अनेक सभा घेतल्या आहेत. त्यामुळे ताणतणाव होता. पण आता माझी तब्बते ठीक झाली आहे. दरम्यान, राज्यसरकार स्थापनेमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
सरकार स्थापन्याचे आमचे उत्तरदायित्व
महाराष्ट्रातील जनतेने आम्हांला निवडून दिले आहे. ते चांगले सरकार स्थापन करण्याचे, ते आम्ही पूर्ण करणार आहोत. आमचा सर्वांशी चांगला समन्वय आहे. त्यामुळे चांगले सरकार देण्यासाठी आमच उत्तरदायित्व आता जनतेबरोबर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विरोधी पक्षासाठी संख्याबळही नाही
कर्नाटक, तेलंगणा, झारखंड तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनाही यश मिळाले. तेव्हा ईव्हीएम मशिन चांगले होते. मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांना अपयश आले की, ईव्हीएम मशिन यंत्रणेबाबत बोलू लागले आहेत. हे योग्य ठरत नाही. या निवडणुकीत मुळात आता विरोधकांकडे विरोधीपक्ष म्हणून काम करण्यासाठी पुरेसे संख्याबळच राहिले नाही. त्यामुळे आता त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याने ईव्हीएम मशिनचे भांडवल करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.