हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे चौथे छत्रपती, सातारा नगरीचे संस्थापक श्री.छ.शाहू महाराज (थोरले) यांच्या प्रती सातारकरांच्यावतीने रविवार दि. १५ डिसेंबर रोजी कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
सातारा : हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे चौथे छत्रपती, सातारा नगरीचे संस्थापक श्री.छ.शाहू महाराज (थोरले) यांच्या प्रती सातारकरांच्यावतीने रविवार दि. १५ डिसेंबर रोजी कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. संगममाहुली येथील श्री.छ.शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीस्थळी त्यांच्या २७५ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ८.३० वाजता मावळा फौंडेशन, शहरातील सर्व सामाजिक संस्था, जनता सहकारी बँकेच्यावतीने आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी शाहूनगरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.
श्री.छ. शाहू महाराज (थोरले) हे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचे पुत्र होते. भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. मध्य भारत, उत्तर भारत, माळवा, गुजरात हे महाराष्ट्रा बाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले, मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला. त्यांची समाधी संगममाहुली येथे असून रविवार दि.१५ डिसेंबर रोजी समाधीस्थळी होणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमास सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहनही मावळी फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.