बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
सातारा : बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. दंडाच्या नव्या नियमानुसार गाडी चालविणारा चालक आणि मागे बसलेला सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे.
महामार्गावर वेग मर्यादा ओलांडून वेगाने वाहन चालविल्यास आता एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. निष्काळजीपणे आणि आरटीओ कार्यालयात नोंदणी नसताना वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. वाहतूक विभागांना याबाबतचे आदेश दिले आहेत. इन्शुरन्स नसताना वाहन चालविल्यास चालक आणि मालक या दोघांनाही यापुढे दंड भरावा लागणार आहे.
मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी अंमलबजावणी..
सातारा जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे तरी अपघात होत असतातच. त्यामध्ये सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वारांचे होत आहेत. यात दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागत आहे. हे मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने दुचाकीवर असलेल्या दोघांनाही हेल्मेट सक्ती केली आहे परंतु ही सक्ती केवळ सध्याच्या स्थितीला महामार्गावर सुरू झाली आहे. त्यामुळे दोघेजण विनाहेल्मेट दुचाकी घेऊन महामार्गावर गेल्यास संबंधितांना एक हजारांचा भुर्दंड बसणार आहे.