येथील भारती फाउंडेशनतर्फे गुरुवार बागेत आयोजित ‘कलाकारी’मध्ये रविवारी सकाळी रंग, माती, शब्द अन् सुरांचा उत्स्फूर्त आविष्कार पाहायला मिळाला. हा महोत्सव पाहण्यासाठी आबालवृद्ध कलाप्रेमींनी सकाळपासून गर्दी केली होती.
सातारा : येथील भारती फाउंडेशनतर्फे गुरुवार बागेत आयोजित ‘कलाकारी’मध्ये रविवारी सकाळी रंग, माती, शब्द अन् सुरांचा उत्स्फूर्त आविष्कार पाहायला मिळाला. हा महोत्सव पाहण्यासाठी आबालवृद्ध कलाप्रेमींनी सकाळपासून गर्दी केली होती. हा सांस्कृतिक सोहळा पाहण्यासाठी मुंबई, पुण्यासह जर्मनीतून आलेल्या ९० वर्षीय इल्झे विगॅन्डही रसिक आले होते. कलेच्या उपासकांसह रसिकांसाठीही ही मोठी पर्वणी होती. कलाकारी महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष असून, हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे.
ज्यामध्ये कलेशी जोडले गेलेले लोक, कलेचे जपणूक करणारे लोक आणि कलेत रस असणारे सामान्य नागरिक सहभागी होतात. यात राज्यातून अनुभवी आणि नवोदित शिल्पकला, चित्रकला, पॉटरी, ओरिगामी, रांगोळी, कॅलीग्रॉफी, गायन व वादन आदी कलाकारांनी कला सादर केल्या. यावेळी कलाप्रकारात निमंत्रित ३०, तर उत्स्फूर्त १५ कलाकार सहभागी झाले. निमंत्रित कलाकरामध्ये सुप्रसिद्ध चित्रकार अमित ढाणे, सागर गायकवाड, प्रा. राहुल पगारे, संकेत थोरात, शिल्पकला प्रकारात शिल्पकार संजय कुंभार, रवींद्र कुंभार, करण कुंभार, कॅलिग्राफीत ओंकार पाटील, पॉटरीमध्ये वैशाली कदम, रांगोळी आकाश दळवी हे, तर शास्त्रीय गायन व वादन प्रकारात न्यास म्युझिक ग्रुप, सरस्वती म्युझिक क्लासेस व स्वर सुगंध शहनाई ग्रुपच्या वतीने कला सादर करून अनेकांची मने जिंकली.
छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या आषाढी वारी या विषयाला समर्पित निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनास रसिकांना आस्वाद घेता आला. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी भारती फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र भारती, शिल्पकार महेश लोहार, भारती फाउंडेशन व कलाकारी टीम सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
चौकट
शिल्पकार दादासाहेब सुतारांचा गौरव
या महोत्सवाचे प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे, पुणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी कराडमधील ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार दादासाहेब सुतार यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले.
चौकट
अनेकांना आवरेना सेल्फीचा मोह
दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी कलाकारी महोत्सवाला शेकडो कलारसिकांनी शाहू उद्यानात सकाळी भेट दिली. विविध कलाकृतींचा आस्वाद घेताना आणि त्यांच्यासोबत फोटो काढताना कलाप्रेमी हरवून जात होता विशेषतः या कला महोत्सवात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. मात्र, त्यातही तरुण आणि तरुणींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या महोत्सवाला लाभला.