क्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक व शिवाजी उदय मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सदाशिवराव तथा बबनराव उथळे (आण्णा), (वय ९८) यांचे काल सोमवारी रात्री ९.३० वाजता वार्धक्याने सातारा येथे निधन झाले.
सातारा : क्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक व शिवाजी उदय मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सदाशिवराव तथा बबनराव उथळे (आण्णा), (वय ९८) यांचे काल सोमवारी रात्री ९.३० वाजता वार्धक्याने सातारा येथे निधन झाले. आज मंगळवारी (दि. २६) त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
काल त्यांचे रात्री निधन झाल्यानंतर निधनाची बातमी कळताच त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी जाऊन अंत्यदर्शन घेतले. आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी सकाळी अनेकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव श्री. शिवाजी उदय मंडळाच्या क्रिडांगणावर अंत्यदर्शनासाठी ठेवणेत आले. तेथेही अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर सकाळी झालेल्या आदरांजली सभेस मोठ्या संख्येनं क्रीडापटू व शिवाजी मंडळाचे चाहते उपस्थित होते.
बबनराव उथळे याच्या मागे मुलगा प्रसाद, त्याची पत्नी मनिषा, मोठी सुन सविता, तीन नाती, तीन मुली सुशिला, पुष्पा व रेखा, तीन जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार व दादोजी कोंडदेव पुरस्कार देऊन अण्णांच्या क्रीडा कर्तृत्वाचा उचित सन्मान केलेला आहे. बबनराव उथळे यांना सर्वजण गुरुवर्य आणि अण्णा असे संबोधित असत. अण्णांना सातत्याने ७० वर्षे शिवाजी उदय मंडळा मैदानावर राहून खेळाडू घडविण्याचा ध्यास होता. लाल मातीतील एक पर्व संपले, अशा भाषेत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली.