येथील माची पेठेतील बेगम मस्जिद परिसरात तीन तरसांचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री दहाच्या दरम्यान काही युवकांना रस्त्यावर तरस दिसल्याने त्यांची पळापळ झाली.
सातारा : येथील माची पेठेतील बेगम मस्जिद परिसरात तीन तरसांचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री दहाच्या दरम्यान काही युवकांना रस्त्यावर तरस दिसल्याने त्यांची पळापळ झाली. या तरसांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
बेगम मस्जिद परिसरातील नागरी वसाहत ही शनिवार पेठ आणि माची पेठ या दोन पेठांमध्ये विभागली आहे. शनिवारी रात्री बागवान बिल्डिंग कडून रस्त्याच्या चढाने रात्री दहाच्या दरम्यान एका युवकाला एक तरस अचानक वर पळत येताना दिसले. सामान्यतः तरस हा श्वान कुळातील असून तो मनुष्यापासून चार हात लांब राहणे पसंत करतो. शिकारीसाठी तरस कायम कोंबड्या, डुक्कर, कुत्री यांना लक्ष्य करतो. कदाचित शिकारीच्या दृष्टीनेच हे तरस मानवी वस्तीत आल्याची माहिती मिळत आहे.
माची पेठेमध्ये प्रत्यक्षात दोन मोठी तरस व एक लहान पिल्लू यांचा वावर आढळून आल्याने परिसरातील युवकांची धावपळ झाली. दोन तरस डोंगराच्या दिशेने पंधरा मिनिटांमध्ये दिसेनासे झाले. या परिसरातील काही डुकरांची त्यांनी शिकार केल्याची चर्चा आहे. मात्र मानवी वस्तीत खुलेआम तरसाचा वावर वाढल्यामुळे रात्री उशिरा रस्त्यावर फिरणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा वनविभागाने अद्याप या संदर्भात कोणती हालचाल केली नाही. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्यांनी सकाळी येऊन काही नागरिकांकडून याची माहिती घेतली. सातारा वनविभागाचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांच्याकडे काही नागरिकांनी लेखी तक्रार पाठवली आहे. याबाबत येत्या काही दिवसात संबंधित प्राण्यांचा बंदोबस्त केला जाईल, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली आहे.