यंदा राज्यात दर वर्षीच्या तुलनेत चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये राज्यात चिकुनगुनिया रुग्णांची संख्या यावर्षी सर्वाधिक असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
पुणे : यंदा राज्यात दर वर्षीच्या तुलनेत चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये राज्यात चिकुनगुनिया रुग्णांची संख्या यावर्षी सर्वाधिक असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यंदाच्या वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत 5,400 हून अधिक नवीन चिकनगुनियाची प्रकरणे नोंदवली गेली. चिकुनगुनियामुळे 2023 मध्ये 1,458 प्रकरणे नोंदवली गेली आणि एकही मृत्यू नोंदवला गेला नाही.
यावर्षी आढळून आलेल्या चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये न्युरोलॉजिकल गुंतागुंतही दिसून आली. राज्यात 2006 नंतर चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदवले आहे. यंदा पुण्यासह इतर मोठ्या शहरांमध्ये कीटकजन्य आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील आयसीयू आणि इतरही बेड फूल झाल्याने रुग्णांना अॅडमिट करून घेण्यात अडचणी आल्या. चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये दर काही वर्षांनी पुनरावृत्ती होत असल्याचा पॅटर्न राज्यात दिसून येत आहे. चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर, अकोला,
पुणे आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये नोंदवले गेले आहेत. संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, विषाणूमध्ये कोणतेही उत्परिवर्तन झाले की नाही याची खात्री करण्यासाठी न्युरोलॉजिकल गुंतागुंतीसह अनेक गुंतागुंत असलेल्या गंभीर रुग्णांचे काही नमुने एनआयव्हीला पाठवण्यात आले. यंदाचा विषाणू नवीन स्वरूपाचा नसून याआधीच 2006 मध्ये नोंदवल्या गेलेलाच विषाणू असल्याचे एनआयव्हीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.