विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडी एखाद्या पत्त्याप्रमाणे उडाली. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. भाजपाची राज्यात लाट आली. एकट्या भाजपाच्या पारड्यात 132 जागा पडल्या. तर महायुतीने 233 जागांची घसघशीत कमाई केली. पण अनेक ठिकाणी मतांची बेरीज नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडी एखाद्या पत्त्याप्रमाणे उडाली. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. भाजपाची राज्यात लाट आली. एकट्या भाजपाच्या पारड्यात 132 जागा पडल्या. तर महायुतीने 233 जागांची घसघशीत कमाई केली. पण अनेक ठिकाणी मतांची बेरीज नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महायुती जनतेच्या मतांवर नाही तर ईव्हीएमच्या मतावर निवडून आल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी त्याविरोधात नाराजीचा सूर आळवला. आता शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत सुद्धा ईव्हीएम आणि एकूणच मतांची गोळाबेरीज जुळत नसल्याने त्याविरोधात एल्गार पुकारण्याची भाषा केली आहे.
ईव्हीएमविरोधात विरोधक आक्रमक
ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आता मागे हटायचं नाही लढायचं
शरद पवारांकडून केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम बाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत. २८ तारखे पर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी अशी ही सूचना देण्यात आली आहे. राज्य पातळीवर ज्या प्रकारे लढाईला सुरूवात करण्यात आली त्याच प्रमाणे इंडिया आघाडी देखील लढाई लढणार असल्याची माहिती शरद पवारांनी उमेदवारांना दिली. आता मागे हटायच नाही लढायचं असा संदेश शरद पवारांनी उमेदवारांना दिला आहे. मविआ एकत्रित तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहे
उद्धव सेना पण आक्रमक
पराभूत झालेल्या उमेदवारांना बोलवलं होते. ईव्हीएममधील घोळासंदर्भात सर्वांनी आपले म्हणणं मांडले. मतदानात तफावत आहे. ५ टक्के व्हीव्ही पॅटची तपासणी होण्यासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. माझ्या मतदारसंघात 10 उर्दू शिक्षिकांना बुरखा घालून बसायला सांगितलं होते, अशी माहिती ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी दिली.
मनसेचे उमेदवार सुद्धा नाराज
मनसे बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबात प्रश्न उपस्थित करण्यात आला. राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत मते जाणून घेतल्याचे समोर येत आहे. भाजप सोबत जाणं ही सुद्धा चूक झाली अशी स्पष्ट नाराजी उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर मांडली आहे.