कुस खुर्द, ता. सातारा गावच्या हद्दीत वन विभागाला आजारी अवस्थेत असलेला बिबट्या आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्यांनी या बिबट्याला ताब्यात घेतले.
सातारा : कुस खुर्द, ता. सातारा गावच्या हद्दीत वन विभागाला आजारी अवस्थेत असलेला बिबट्या आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्यांनी या बिबट्याला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी पुण्यातील वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा बिबट्या दीड वर्षाचा असून त्याला अजून शिकार करता येत नाही. तसेच तो आईपासून विभक्त झाल्याने त्याची ही अवस्था झाल्याची शक्यता अधिकार्यांनी वर्तवली.
कूस खुर्द हे परळी खोर्यातील डोंगरदर्यात वसलेले गाव. या परिसरातील पडीक क्षेत्रामध्ये गुरुवारी रात्री 9 वाजता थकलेल्या अवस्थेतील बिबट्या ग्रामस्थांना आढळून आला. ग्रामस्थांनी वन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपाल अरुण सोळंकी, वनरक्षक मारुती माने व इतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्या थकलेला होता. त्यामुळे तो आक्रमक पहायला मिळत नव्हता. लोकवस्तीपासून 500 मीटरच्या अंतरावर हा बिबट्या भटकत होता. कर्मचार्यांनी बॅटरीच्या उजेडात या बिबट्याला ताब्यात घेतले. बिबट्याला ताब्यात घेऊन सातारा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. यानंतर एका डॉक्टरांच्या टीमने बिबट्यावर प्राथमिक उपचार केले. यावेळी डॉक्टरांना बिबट्याची प्रकृती गंभीर असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी बिबट्याला पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पुण्यातील वन्यजीव केंद्रात बिबट्याला दाखल करण्यात आले आहे. येथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.