व्होट जिहाद म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण असून कटेंगे तो बटेंगे या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. महायुतीने त्यांच्या योजनांचा कार्यक्रम प्रभावीपणे लोकांसमोर मांडला. राज्यातील महाविकास आघाडीच्या पराभवाने आम्ही खचून गेलो असतो तर आज मी कराडमध्ये नसतो.
सातारा : व्होट जिहाद म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण असून कटेंगे तो बटेंगे या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. महायुतीने त्यांच्या योजनांचा कार्यक्रम प्रभावीपणे लोकांसमोर मांडला. राज्यातील महाविकास आघाडीच्या पराभवाने आम्ही खचून गेलो असतो तर आज मी कराडमध्ये नसतो. मी राजकारणातून निवृत्ती बाबत अद्याप निर्णय घेतलेला नसून राज्यभर फिरणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त करत राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
महाराष्ट्र विधानसभेच्या लागलेल्या निकालानंतर व महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडा साफ केल्यानंतर रविवारी सायंकाळी पहिल्यांदाच कराड येथे शरद पवार आलेले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी त्यांना कराड येथे प्रीतीसंगमावरील समाधीला अभिवादन करण्यासाठी शरद पवार हे कराड येथे रविवारी मुक्कामास आलेले आहेत. सोमवारी (दि.२५) यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला कराड येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक आहे आम्हाला अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेला नाही परंतु आम्ही सामुहिक कष्ट केले, पण निर्णय अपेक्षित लागलेला नाही हे खरे आहे. विधानसभा निवडणुकीत सामूहिक कष्ट घेतले पण अपेक्षित निकाल आला नाही. ईव्हीएम बाबत आपल्याकडे ठोस असे काही नाही त्यामुळे त्याबाबत काही बोलणे हे उचित ठरणार नाही. अधिकृत व अंतिम आकडेवारी आल्यानंतर त्याचा अभ्यास करणार असून त्यानंतरच त्यावर बोलता येईल.
अजित पवार व युगेंद्र पवार तुलना करणे चुकीचे असून बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्रला निवडणूक रिंगणात उतरवणे यात काही चुकीचं नव्हते. मराठा आणि ओबीसी समाजाला आम्ही वेगळे मानतच नाही आणि ओबीसी बाबत काही वेगळा निर्णय नाही. मंडल आयोगाचा निर्णय आणि त्यांच्या शिफारशी अंमलात आणण्याचा निर्णय हा माझाच होता असाही निर्वाळा शरद पवार यांनी दिला.
निवडणुकीचा निर्णय काहीही लागला असला तरी तो लोकांनी दिलेला आहे. त्यामुळे त्या विरोधात न्यायालयात जाणार नाही, असे स्पष्ट करून शरद पवार म्हणाले, आमच्यातून गेलेल्यांना चांगले यश मिळालेले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्यांना चांगल्या जागा मिळालेले आहे. हा जनतेने निर्णय दिलेला आहे. आम्ही लोकांना सामोरे जाऊन पराभवाची कारणे समजून घेऊ. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेता असण्यासाठी विरोधकांकडे संख्याबळ नाही. पण सक्षम विरोधी पक्षनेता असणे गरजेचे आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.
आम्ही सत्तेत आलो नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल तसेच कटेंगे तो बटेंगे हा प्रचार महायुतीने प्रभावीपणे मांडला त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले आणि महायुतीला त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. महायुतीने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कशी होईल याची लोक आता वाट पाहत आहेत. कर्तुत्ववान पिढी आम्ही आता निर्माण करण्यासाठी लोकांना सामोरे जाणार आहोत आणि अधिक कष्ट घेऊन पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्ही गप्प बसणार नसून राज्यभर फिरणार असल्याचा निर्धारही शरद पवार यांनी व्यक्त केला.