साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज साताऱ्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
सातारा : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज साताऱ्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “इंधन दरवाढ कमी करा”, “सामान्य जनतेला दिलासा द्या” अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरामुळे महागाईत मोठी भर पडत असून सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना मेलडी चॉकलेटचे वाटप करून केंद्रातील मोदी सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या आंदोलनात सुमारे १०० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत विविध नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका करत इंधनावरील कर कमी करण्याची मागणी केली.
जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील म्हणाले, “पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि वाहतूक व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढ नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा.”
या आंदोलनामुळे काही काळ परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिस बंदोबस्तात मोर्चा शांततेत पार पडला.