एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराला ताकद दिली. मतदारसंघात प्रचंड निधी आल्याने जनतेची कामे मार्गी लावली. सत्तांतर केले त्याचवेळी पुन्हा विधानसभेत येण्यासाठी झटून कामाला लागायचे ठरवले.
सातारा : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराला ताकद दिली. मतदारसंघात प्रचंड निधी आल्याने जनतेची कामे मार्गी लावली. सत्तांतर केले त्याचवेळी पुन्हा विधानसभेत येण्यासाठी झटून कामाला लागायचे ठरवले. अपवाद वगळता सर्व आमदार निवडून आले. सिंचन प्रकल्प मार्गी लागत आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे माता-भगिणींनी आशीर्वाद दिल्याचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील सिंचन भवनाच्या शासकीय विश्रामगृहात शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले,कोरेगाव मतदारसंघातील नाराज कार्यकर्त्यांची मोट बांधणार का? असे विचारले असता ना. महेश शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर कोणताच कार्यकर्ता सोडून गेला नाही. विरोधकांकडे गेलेले कार्यकर्ते त्यांचे होते तर काहीजणांची कार्यपद्धती पटणारी नसल्याने त्यांना आम्हीच सोडले होते. आम्ही गोरगरीबांच्या सेवेचे व्रत घेऊन काम करताना काही कार्यकर्ते वैयक्तिक कामांना प्राधान्य देत होते. कामाच्या पद्धतीत बदल जाणवला तर अशा कार्यकर्त्यांपासून आम्हीच बाजूला होतो, असे त्यांनी सांगितले.
मतदारसंघातील वाढीव एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार का? असे विचारले असता ना. महेश शिंदे म्हणाले, एमआयडीसी करताना स्थानिकांची भूमिका महत्त्वाची आहे. निगडी, देवकरवाडी, वर्णे, राजेवाडी या गावातील ग्रामस्थांचा एमआयडीसीला पूर्ण विरोध आहे. त्यामुळे काहीही झाले तरी वाढीव एमआयडीसी होणार नसल्याचे आ. महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत खा. उदयनराजेंना जेवढे मताधिक्य मिळाले त्यापेक्षा अधिक मताधिक्य विधानसभा निवडणुकीत आमदारांना मिळाले याबाबत विचारले असता ना. महेश शिंदे म्हणाले, या निवडणुकीत धर्मात विभागणी करण्याचा प्रयत्न झाला. चुकीचे नॅरेटिव्ह पसरवून मुस्लिम व बौध्द यांची मते बाजूला काढण्यात आल्याचा हा परिणाम होता. विधानसभा निवडणुकीत नॅरेटिव्ह पसरवता आला नाही. याशिवाय राज्य शासनाने विकासकामांना निधी दिल्याने मताधिक्य मिळाले, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोणत्या कार्यकर्त्यांना संधी देणार, असे विचारले असता ना. महेश शिंदे यांनी पक्षाकडून दिल्या जाणार्या उमेदवारांना संधी दिली जाईल, असे सांगितले.
ना. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघातील 21 गावांतील पुनर्वसित धरणग्रस्तांचे प्रश्न दीड महिन्यांत सोडवणार आहे. या निवडणुकीत विजयी होण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. मंत्रिपद मिळावे ही मतदारसंघातील लोकांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. काही ठिकाणी थांबणे व पुढे सरकणे उचित असते. पहिल्या टर्ममध्ये आमदार होऊन कॅबिनेट दर्जाचे पद मिळाले. लाल दिव्याची गाडी मिळाली. देगाव-निगडी पाणी योजनेचे महिन्यात टेंडर काढून तीन महिन्यांत काम सुरू करणार आहे. परिसरातील सर्व गावे बागायत करणार असल्याचे ना. महेश शिंदे यांनी सांगितले. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, संदीपभाऊ शिंदे, राहूल बर्गे, अतुल माने आदि कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.