जावळी तालुक्यातील धरणाची अपूर्ण कामे, बोंडारवाडीचा वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न, आरोग्य सुविधांची वानवा, ऊस उत्पादक शेतकर्यांची अडवणूक, मुंबई-पुण्याकडे युवकांचे मोठ्या होणारे प्रमाणावर विस्थापन, अशा समस्या आहेत.
सातारा : जावळी तालुक्यातील धरणाची अपूर्ण कामे, बोंडारवाडीचा वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न, आरोग्य सुविधांची वानवा, ऊस उत्पादक शेतकर्यांची अडवणूक, मुंबई-पुण्याकडे युवकांचे मोठ्या होणारे प्रमाणावर विस्थापन, अशा समस्या आहेत. शिरवळ आणि कराड औद्योगिक वसाहतीचा विकास होत असताना सातारा एमआयडीसी मागे का राहिली? या अपयशाची जबाबदारी विद्यमान लोकप्रतिनिधींनी घ्यावी, अन्यथा सूज्ञ मतदार 20 नोव्हेंबरला मतदान यंत्रातून आपला उद्वेग व्यक्त करतील, असा इशारा अमितदादा कदम यांनी दिला.
शिवसेना उद्धव ठाकरे गट व महाविकास आघाडीचे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमितदादा कदम यांच्या प्रचारार्थ भणंग (ता. जावळी) येथे कोपरा सभा झाली. या सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, सातारा एमआयडीसीचा विकास का खुंटला? येथील तरुणांचे लोंढे महानगरांकडे का वळले? सहकारी संस्था बंद का पडल्या? निम्मी अर्धी गावे कशामुळे ओस पडली, या प्रश्नांची उत्तरे विद्यमान लोकप्रतिनिधींनी द्यावीत. दुसर्यावर पोकळ टीका करून, स्वतःचा नाकर्तेपणा लपवू नये. निवडणुकीत मोठमोठी भाषणे झोडणारे लोकप्रतिनिधी गत 25 वर्षांत सभागृहात किती वेळा बोलताना दिसले? मतदारसंघातील प्रश्न संपले का?
दरम्यान, अमितदादा कदम यांच्या प्रचारार्थ सातारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मशाल फेरी काढण्यात आली. राजपथ, गोलबाग, मोती चौक, कर्मवीर पथावरून, पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, यात्रेची सांगता झाली. या फेरीत अमितदादा कदम यांनी ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधला.
लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक ऍड. वर्षा देशपांडे, कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष रजनी पवार, उपाध्यक्ष माधवी वरपे, ऍड. शैला जाधव, मिनाज सय्यद, सौ. शीतल कदम, कविता बनसोडे, मालती जावळे, तेजस्विनी केसरकर, अंजली भुते, ऋतुजा भोसले, सुषमा कदम, प्रा. संजीव बोंडे, वैशाली चिकणे, जावळी बँकेचे संचालक योगेश गोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे, रफीक शेख, सुरेश पार्टे, संतोष चव्हाण, रामचंद्र चिकणे, रवींद्र शेलार, प्रमोद जाधव, गांजे विकास सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, अतिश कदम, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक सादिक बागवान, गणेश अहिवळे रॅलीत सहभागी झाले होते.