महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर सध्या खल सुरू असून, याबाबतच्या निर्णयानंतरच शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
सातारा : महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर सध्या खल सुरू असून, याबाबतच्या निर्णयानंतरच शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
सातारा जिल्ह्याने महायुतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्ह्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. यामध्ये शिवसेनेकडून शंभूराज देसाई, भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील यांची नावे चर्चेत आहेत. ही सर्व मंडळी मुंबईतच ठाण मांडून असून, सर्वांच्या नजरा शपथविधीकडे लागल्या आहेत.
महायुतीने स्पष्ट बहुमत मिळविल्यामुळे त्यांचे सरकार सत्तेत येणार आहे; पण महायुतीतील तीन प्रमुख पक्षातील कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रिपदावर संधी द्यायची यावर दिल्लीत चर्चा सुरू आहे. याबाबत सलग दुसऱ्या दिवशीही खल सुरू होता. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे तिन्ही नेत्यांशी चर्चा करूनच घेणार आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सात मंत्र्यांचा शपथविधी पहिल्यांदा होणार आहे. सध्या तरी महायुतीचे सर्व आमदार मुंबईत ठाण मांडून आहेत. आज सर्वच आमदारांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली. जिल्ह्यातून महायुतीचे आठ आमदार निवडून आल्याने आता जिल्ह्यातून कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता कायम आहे.
सध्यातरी शिवसेनेकडून शंभूराज देसाई, भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील यांची नावे चर्चेत आहेत. ही मंडळी मुंबईतच ठाण मांडून आपापल्या पक्षाच्या नेत्यांशी संपर्क ठेऊन आहेत. सर्वांच्या नजरा शपथविधीकडे लागल्या आहेत.