देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती
सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील देगाव येथील पोलीस पाटील श्री. मानाजी निकम यांचा सेवानिवृत्ती समारंभ आज उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
सातारा : सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील देगाव येथील पोलीस पाटील श्री. मानाजी निकम यांचा सेवानिवृत्ती समारंभ आज उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे, सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा प्रशासनाच्या वतीने प्रथमच असा सन्मानपूर्वक समारंभ आयोजित करण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.
सदर समारंभ सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. निलेशजी तांबे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पोलीस पाटील एकीकरण संघाचे राज्याध्यक्ष प्रवीणजी राक्षे, राज्यसचिव दीपक गिरी, गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड तसेच कार्याध्यक्ष महेशजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक तांबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, श्री. निकम यांनी सैन्यात सेवा बजावल्यानंतर तब्बल 17 वर्षे पोलीस पाटील म्हणून गावाची निष्ठेने सेवा केली. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याचप्रमाणे विलास माने पाटील यांनीही श्री. निकम यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश रोकडे पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास माने पाटील यांनी केले. कार्यक्रमास गजानन चवरे पाटील, दत्ता पाटील, राजेंद्र गोरे पाटील, विक्रम भोसले पाटील, किरण पाटील, अमीन पटेल, बबन पाटील, ज्योतीराम पाटील, सुरेश सोपानराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा प्रशासनाच्या वतीने प्रथमच सन्मान करण्यात आल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत पोलीस निरीक्षक तांबे यांचे आभार मानले. तसेच मानाजी निकम यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे नियोजन गोपनीय अंमलदार कुंभार आणि महेंद्र नारनवर यांनी केले.