महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली असून यामध्ये फसवेगिरी होणार नाही. या योजना राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरू होतील.
सातारा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली असून यामध्ये फसवेगिरी होणार नाही. या योजना राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरू होतील. सातारा जिल्ह्यातील निवडणुकीतही महाविकास आघाडी एकदिलाने काम करत आहे. काही नाराजी असेल तर दोन दिवसांत दूर होईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांनी दिली.
येथील काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष डाॅ. जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अरबाज शेख आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष डाॅ. जाधव म्हणाले, राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी महाविकास आघाडीने लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. महिला, मुली, तरुण आणि शेतकरी वर्गांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. काँग्रेसने तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात पाच गॅरंटी दिल्या होत्या. त्या योजना आजही तेथे सुरू आहेत. तसेच महाराष्ट्रातही ही पंचसूत्री सत्ता आल्यानंतर लागू होईल. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल.
सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आघाडी धर्माचे पालन का होत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर जिल्हाध्यक्ष डाॅ. जाधव यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडी एकसंघ आहे. काँग्रेस आघाडी धर्म पाळत आहे. नाराजी कोठे असेल तर दोन दिवसांत ती दूर होईल. समजूत काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही एकदिलानेच काम करत आहोत, असे स्पष्ट केले.
उदयनराजेंच्या प्रश्नांवर वरिष्ठ उत्तर देतील...
पत्रकार परिषदेत सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोप केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या शब्दाचा अनर्थ केला असावा. याची पूर्ण माहिती घेण्यात येईल. तसेच याबाबत पक्षाचे वरिष्ठ अधिकृतपणे उत्तर देतील, असे उत्तर देण्यात आले. तसेच महायुतीकडून खोटा प्रचार होत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.