पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा
वाढत्या दिखाऊपणा, अवाजवी खर्च आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणार्या विवाह सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर तांबवे (ता. वाळवा) येथील सामाजिक कार्यकर्ते रतन पाटील यांनी आपल्या मुलाचा विवाह अत्यंत साधेपणाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सातारा : वाढत्या दिखाऊपणा, अवाजवी खर्च आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणार्या विवाह सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर तांबवे (ता. वाळवा) येथील सामाजिक कार्यकर्ते रतन पाटील यांनी आपल्या मुलाचा विवाह अत्यंत साधेपणाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
रतन पाटील यांचे सुपुत्र चि. धीरज आणि कु. सौ. कां. समृद्धी यांचा विवाह पुणे येथील सिद्धी कार्यालय, एरंडवणे येथे झाला. या विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च, मोठा मंडप, डीजे, वरात, तसेच हुंडा प्रथा पूर्णपणे टाळण्यात आली. विवाह ठरवितानाही रतन पाटील त्यांच्या पत्नी सुनिता पाटील, संदीप हवालदार, शीतल हवालदार यांनी थेट चर्चा करून साधेपणाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते रतन पाटील यांनी त्यांचा विवाहसुद्धा अशाचप्रकारे साधेपणाने करुन घेतला होता.
विवाहासाठी दोन्ही पक्षांकडील मिळून केवळ 200 पाहुण्यांची उपस्थिती ठेवण्यात आली. त्यामुळे वाहनांचा वापर, इंधन खर्च, वेळ आणि पैशांची मोठ्या प्रमाणात बचत झाली. तसेच फटाके, आरासबाजी व ध्वनीप्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या विवाहातून वाचलेली रक्कम 1 लाख 11 हजार 111 रुपये तांबे येथील कृष्णा काठ विकास प्रतिष्ठान या संस्थेला देणगी म्हणून देण्यात आले. ही रक्कम बँकेत ठेवून त्यावरील व्याजातून दरवर्षी वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाची कामे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच नवदांम्पत्य दरवर्षी लग्नाच्या वाढदिवशी वृक्षारोपण करणार असून दर लग्नाच्या वाढदिवसाला या फंडामध्ये भरच घालणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नवदांम्पत्याचेही कौतुक होत आहे.
या देणगीचा धनादेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या हस्ते संस्थेचे सचिव चंद्रकांत पाटील आणि सदस्य युवराज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
आजकाल विवाह समारंभात होणारा अवाढव्य खर्च, वेळेचा अपव्यय आणि पर्यावरणाची हानी ही गंभीर समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत रतन पाटील परिवाराने साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. या लग्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.