सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांने सन्मानित
इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया ही एक नामांकित कंपनी असून त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो.
सातारा : इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया ही एक नामांकित कंपनी असून त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो. या संस्थेच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस "सर्वोत्कृष्ट बैंक" पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी पोलीस जॉईंट कमिशनर मा. श्री. संजय शिंदे यांचे शुभ हस्ते आणि इंडियन बँकिंग असोसिएशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोपाल भगत, संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. जाहिद सिद्धिकी, श्री. प्रेषित देशमुख तसेच ज्युरी श्री प्रमोद कर्नाड, व श्री. यशवंत पाटील या मान्यवरांचे उपस्थितीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत मांढरे, श्री. संभाजी यादव यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम खोपोली येथील नोवोटेल हॉटेल येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन रिझर्व्ह बँकेचे आणि नाबार्डचे संचालक मा. श्री. सतीश मराठे यांचे हस्ते झाले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हयाची अर्थवाहिनी असून, ग्रामीण व शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरविणेचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श असणारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विशेष उल्लेख आहे जिल्हयातील सर्वसामान्यांचे आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ट निधी नियोजन, 'शून्य' टक्के निव्वळ एन. पी. ए, दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगव्दारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आयएसओ ९००१-२०१५ मिळालेले मानांकन, तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमठविलेला असून याच सर्वकष कामकाजाबद्दल सर्वोत्कृष्ट बैंक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष मा. खा. श्री. नितीन पाटील म्हणाले, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. मा. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे.
याप्रसंगी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, या पुरस्कारांमुळे बँकेच्या नांवलौकिकामध्ये आणखी भर पडली आहे. देशामध्ये गौरवशाली परंपरा असलेली व बँकिंग क्षेत्रामधील आदर्श बँक म्हणून बँकेचा नावलौकिक आहे. बँक सर्वसामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा व सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात याकरीता बँक ३२० शाखा, ६७. ए.टी.एम, ६५० मायक्रो ए.टी.एम आणि ए.टी.एम मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून जिल्हयाच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी निरंतर कार्य करीत आहे. पुरस्कार मिळणे हा बँकेवरील ग्राहकांचा दृढ विश्वासासाठी आवश्यक असून बँकेस शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी अशा विविध नामांकित संस्थांकडून आजअखेर ११९ पुरस्कार मिळविणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एकमेव बँक ठरेल असा विश्वास यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी व्यक्त केला.
मा. श्री. संजय शिंदे यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून विशेष उल्लेख करून बँकेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामकाजाची प्रशंसा केली यावेळी ते म्हणाले मी अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सातारा येथे काम करीत असताना बँकेच्या आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ठ कार्यप्रणाली आणि राजकारण विरहित कामकाजाची प्रशंसा केली.
या पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मा ना श्री. मकरंद पाटील, मा. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, माजी सहकार मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई तसेच सर्व संचालक सदस्य यांनी अभिनंदन करून बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.