सायकलस्वार मृत्यू प्रकरणी टेम्पो चालकास शिक्षा
रस्त्यावर बेदरकारपणे टेम्पो उभा करून ठेवत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने एका तरुण सायकलस्वाराचा मृत्यू झाला.
सातारा : रस्त्यावर बेदरकारपणे टेम्पो उभा करून ठेवत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने एका तरुण सायकलस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी टेम्पो चालकास दोषी ठरवत तीन वर्षांची साधी कैद व एकूण ४,२०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद शं. वाघमारे यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी अविनाश शंकर पवार (वय २३, रा. पंताचा गोट, रविवार पेठ, सातारा) याने ३१ ऑगस्ट २०१६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आकाशवाणी झोपडपट्टी ते महानुभव मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अत्यंत निष्काळजीपणे टेम्पो (क्रमांक एम.एच. ११ बी.एल. ५८६५) उभा केला होता. टेम्पोमध्ये नविन पानफळ्यांचा माल ६ ते ७ फूट बाहेर आलेला असतानाही कोणतीही सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली नव्हती. टेम्पोच्या लाईटही बंद होत्या आणि तो थेट रस्त्याच्या मध्यभागी उभा करण्यात आला होता.
याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या आकाश विजय विभूते (वय २०, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) या तरुण सायकलस्वाराची टेम्पोला जोरदार धडक बसली. या अपघातात आकाश विभूते यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात हयगयने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. डी. देवकाते यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनुराधा शंकर निंबाळकर यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला.
खटल्यादरम्यान एकूण सात साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावे तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर करण्यात आला. सर्व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अविनाश पवार याला भारतीय दंड विधान संहिता कलमानुसार तीन वर्षांची साधी कैद व ३,००० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद सुनावली. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या खटल्यातील सरकारी बाजूची प्रभावी पैरवी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही. बी. ढमाळ व पोलीस कॉन्स्टेबल डी. जी. घाडगे यांनी केली.