कोण आडवा येतो ते मी बघतोच
जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच असून, “कोण आडवा येतो ते मी बघतो” असा सज्जड इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता धरणाचे राजकारण करणाऱ्यांना दिला.
सातारा : जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच असून, “कोण आडवा येतो ते मी बघतो” असा सज्जड इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता धरणाचे राजकारण करणाऱ्यांना दिला.
ते सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील केळघर–मेढा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी माजी आमदार दगडूदादा सकपाळ, अंकुश कदम, सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे, माजी सभापती बापुराव पार्ते, एकनाथ ओंबळे, सविता ओंबळे, संदीप पवार, अतिश कदम, विठ्ठल गोळे, शिल्पा शिंदे, शशिकांत शिंदे, रेश्मा जगताप यांच्यासह नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, उमेदवार आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जावळी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेलाच भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन केले. महाबळेश्वर, तापोळा, केळघर, मेढा, प्रतापगड परिसरात नवीन रस्ते, पूल आणि पर्यटन मार्ग विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रतापगडाच्या विकासासाठी २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली.
याशिवाय या भागात इको-टुरिझम, अॅग्रो-टुरिझम, होम-स्टे, फार्म-स्टे आणि ग्रामीण पर्यटन विकसित करून स्थानिक युवकांना रोजगार देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साताऱ्यात १०० खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्यात येणार असून, महिला बचत गटांसाठी ‘उमेद मॉल’ सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पापड, लोणची, बांबू उत्पादने यांसारख्या ग्रामीण उत्पादनांचे ब्रँडिंग करून महिलांना उद्योजक बनवण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बोंडारवाडी धरणाबाबत बोलताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, हे धरण पूर्ण होणारच असून त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि जिल्ह्यात हजारो रोजगार निर्माण होतील.
ही निवडणूक विकास, स्वाभिमान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची असल्याचे सांगत, नोकरी व रोजगारासाठी तरुणांचे मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.