कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला
सातारा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका बंदीवानाने ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली.
सातारा : सातारा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका बंदीवानाने ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे कारागृह परिसरात काही काळ खळबळ उडाली.
याबाबत जेल पोलीस किरण हरीचंद्र यादव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाद्या उर्फ ऋषिकेश शशिकांत पवार (वय २१, रा. काळोशी, ता. जि. सातारा) हा न्यायालयीन कोठडीत असताना सर्कलवर चढून इतर कैद्यांशी बोलत होता. त्यावेळी ड्युटीवरील पोलिसांनी त्याला खाली उतरून कारागृहातील नियमांचे पालन करण्यास सांगितले.
पोलिसांनी हटकल्याचा राग आल्याने संबंधित बंदीवानाने पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत मारहाण केली. उपस्थित पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.