भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत
सातारा पालिकेचे माजी नगराध्यक्ष, सातारा नगरपालिकेतील भाजपाचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी 2025 मध्ये झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाणूनबुजून खोटी माहिती सादर केली आहे.
सातारा : सातारा पालिकेचे माजी नगराध्यक्ष, सातारा नगरपालिकेतील भाजपाचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी 2025 मध्ये झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाणूनबुजून खोटी माहिती सादर केली आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये बर्याच मिळकती या घोषित न करता तसेच शासकीय, निमशासकीय थकबाकी असतानासुध्दा निरंक लिहून दिशाभूल केली होती. याबाबत सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निशांत पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अपात्र करण्याबाबत दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकार्यांनी गांभीर्याने दखल घेऊन प्रांताधिकारी यांची नियुक्ती करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याबाबत आता उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांच्या दालनात 2 जून रोजी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आता भाजपाचे सातारा नगरपालिकेतील पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी निवडणुकीच्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत खोटी आणि दिशाभूल करणारी तसेच अपूर्ण माहिती देऊन फसवणूक केली असल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार स्पष्ट झाले होते. याबाबत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अपात्र करावे, अशी मागणी सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती.
निशांत पाटील हे नगराध्यक्ष राहिले असून अनेक वर्षे नगरसेवक राहिले असल्याने त्यांना कायद्याचे संपूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे काय दाखवावे, काय दाखवू नये याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. तसेच अपूर्ण माहिती दाखल केल्यास तो गुन्हा होऊ शकतो याचेही त्यांना ज्ञान आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये अशी दडवादडवी करणे त्यांना शोभत नाही. सध्या ते भाजपाचे पक्षप्रतोद असूनही त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना हेतुपुरस्पर खोटी माहिती दाखल केली हे गंभीर असून त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, त्यासाठी तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी चौकशीपूर्वीच नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा. मी दिलेले पुरावे सही शिक्क्याचे असून प्रतिज्ञापत्र माहिती अधिकारात प्राप्त करुन घेतले असून नंतर तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत 2 जून रोजी प्रांताधिकार्यांच्या दालनात सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इतर नगरसेवकांची कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे माहिती अधिकारात प्राप्त करुन घेतली असून त्याची पडताळणी सुरु आहे. ज्यांनी ज्यांनी खोटी माहिती अथवा प्रतिज्ञापत्रात स्थावर, जंगम मालमत्ता, शासकीय, निमशासकीय थकबाकी भरली नाही त्यांच्या बाबतीतही लवकरच तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचा इशाराही मोरे यांनी दिला आहे.