स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ मध्ये सातारा जिल्ह्याने देशातील पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्रातही अव्वल स्थान मिळविले आहे.
सातारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ मध्ये सातारा जिल्ह्याने देशातील पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्रातही अव्वल स्थान मिळविले आहे. ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत राबविण्यात आलेल्या प्रभावी स्वच्छता उपक्रमांची ही मोठी पावती मानली जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या विविध निकषांच्या आधारे जिल्ह्यांचे मूल्यांकन करण्यात आले. केंद्रीय समितीकडून १००० गुणांच्या निकषांवर तपासणी करण्यात आली. यामध्ये गावांमधील ओला व सुका कचरा वर्गीकरण, घरगुती कचरा संकलन व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता, शौचालयांचा वापर व देखभाल, स्वच्छता विषयक जनजागृती, लोकसहभाग, शाळा व अंगणवाडी स्वच्छता तसेच स्वच्छतेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश होता.
जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या कामाची संकेतस्थळावर नोंद घेऊन तसेच त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करून अंतिम गुणांकन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात अनेक गावांमध्ये कचरा संकलन व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आली असून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती व सुका कचरा पुनर्चक्रणासाठी पाठविण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी विविध गावांमध्ये शोषखड्डे, रूट झोन, टीबीएफ, डीवॅट आणि ग्रेवॉटर व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ग्रामसभा, रॅली, शाळा अभियान, स्वच्छता शपथ, भित्तीचित्रे आणि लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात आले.
या यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण व अर्थ सभापती तेजीस्विनी कदम, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे तसेच कृषी सभापती लता कर्णे यांनी जिल्हावासीयांचे अभिनंदन केले आहे.
या यशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन लाभले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने, राहुल देसाई, कार्यकारी अभियंता गौरव चक्के, सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, जिल्हा तज्ञ, बीआरसी, ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
''सातारा जिल्ह्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून स्वच्छ भारत अभियानामध्ये जिल्ह्याने देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. मलीन होत चाललेल्या पंचमहाभूतांच्या शुद्धीसाठी आपण अभियानाच्या निमित्ताने एक चांगले काम उभे केले आहे. जलतत्त्व शुद्धीसोबत पृथ्वी तत्त्व शुद्धीसाठी नैसर्गिक शेती व विषमुक्त स्वयंपाकघर, अग्नितत्त्वासाठी सौरऊर्जेला प्राधान्य, वायुतत्त्व शुद्धीसाठी कमी इंधनाचा वापर, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, बायोडिझेल-इथेनॉलचा वापर तसेच फटाक्यांचा कमी वापर यांचा दैनंदिन जीवनात समावेश करावा.'' तसेच समस्त सातारकरांनी स्वच्छतेच्या सवयींमध्ये सातत्य राखून जिल्ह्याला स्वच्छतेत अग्रक्रमी ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे झेडपी अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांनी सांगितले.
''सातारा जिल्ह्याने स्वच्छ भारत अभियानामध्ये देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळून प्रत्येक घरातून घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे. स्वच्छतेच्या सवयींमध्ये सातत्य राखून जिल्ह्याला स्वच्छतेत अग्रक्रमी ठेवण्यासाठी सर्व सातारकर नागरिकांनी यापुढेही असेच प्रयत्न करावेत, असे झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले.