…आता साताऱ्यातही मराठा आंदोलनाच्या तयारीला वेग

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार असून, त्यात साताऱ्यातील मराठा समन्वयक तात्या सावंत यांचाही समावेश असणार आहे.
सातारा : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार असून, त्यात साताऱ्यातील मराठा समन्वयक तात्या सावंत यांचाही समावेश असणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता साताऱ्यातही तयारीला वेग आला आहे.
या आंदोलन आणि उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली. बैठकीत गाववार आढावा घेत आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा समाज बांधवांची माहिती संकलित करण्यात आली. याचबरोबर वाहने व त्यासाठीच्या इतर बाबींचा आढावा देखील घेण्यात आला. या बैठकीनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यास आंदोलनाबाबतचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सातारा तालुक्यातून, तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारो मराठा बांधव रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई येथील आंदोलन हा मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या निर्णायक टप्पा असून, त्यात सर्वांनी सहभागी, तसेच योगदान देण्याचे आवाहन या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्यवयकांच्या वतीने सातारकरांना करण्यात आले.
याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील मराठा समन्वयक मुंबईकडे मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी काही समन्वयकांनी पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या वेळी याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.