तातडीच्या उपचारामुळे दीड वर्षाच्या अनुजला मिळाले जीवदान

सातारा शहरातील आकाशवाणी केंद्रानजीक राहणाऱ्या अनुज काळे या दीड वर्षाच्या चिमुकल्याने न्युमोनिया आणि श्वसनमार्गातील तीव्र विकारामुळे व्हेंटिलेटर सपोर्टरवर राहून मृत्यूशी यशस्वीपणे झुंज दिली.
सातारा : सातारा शहरातील आकाशवाणी केंद्रानजीक राहणाऱ्या अनुज काळे या दीड वर्षाच्या चिमुकल्याने न्युमोनिया आणि श्वसनमार्गातील तीव्र विकारामुळे व्हेंटिलेटर सपोर्टरवर राहून मृत्यूशी यशस्वीपणे झुंज दिली. हे बाळ मध्यरात्री दोन वाजता न्युमोनियामुळे श्वास थांबलेल्या अवस्थेत स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या बाळावर अत्यंत तातडीने अत्यावश्यक उपचार केले. यामुळे जीवदान देण्यात यश मिळाले.
अनुज रुग्णालयात दाखल झाला तेव्हा त्याचा ऑक्सिजन 50 ते 60 टक्के एवढाच होता. त्यामुळे तातडीने त्याला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. आवश्यक त्या सर्व तपासण्या करून घेतल्या व औषधोपचार तात्काळ सुरु केले. अनुज रुग्णालयात दाखल झाला त्यावेळी एक्सरे मध्ये दोन्ही बाजूने छाती न्युमोनियामुळे पूर्णपणे भरलेली दिसत होती. तसेच रक्त 4.4 ग्राम एवढेच होते. त्याला तात्काळ ब्लड ट्रान्सफ्युजन देण्यात आले. तसेच अंतस्त रक्तस्त्रावही सुरु असल्याने त्याला (FFP) फ्रेश फ्रोजण प्लास्मा दिवसातून 3 वेळा 3 दिवस देण्यात आला.
उपचार करत असताना दाखल झाल्यापासून 3 दिवस तो व्हेंटिलेटरवरच होता. त्याचा श्वासोच्छवास सुरु झाल्यानंतर 6 दिवसापर्यंत 24 तास ऑक्सिजनवर ठेवण्यात आले व नंतर ऑक्सिजन लेव्हल पूर्ववत आल्यानंतर बंद करून देखरेखीखाली ठेवण्यात आले.
18 ऑगस्ट रोजी सर्व योग्य ते उपचारांनंतर रुग्ण पूर्णपणे बरा करून योग्य ते औषधे, आहार, स्वच्छता व पुनर्भेटीसाठी योग्य ते समुपदेशन करून रुग्णालयातून सोडण्यात आले. वैद्यकीय पथकाने अनुभव पणाला लावनू अनुजवर उपचार केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे आणि बालरोग तज्ञ विभागप्रमुख डॉ. उल्का झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, परिसेविका सर्व आधिपरिचारिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.