गळा चिरलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये मुलीचा मृतदेह

खंडाळा येथे 14 वर्षीय शाळकरी मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
खंडाळा : खंडाळा येथे 14 वर्षीय शाळकरी मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या शाळकरी मुलीने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, खंडाळा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती.
अनुष्का राकेशकुमार भांबरे (वय 14, मूळ रा. जळगाव, जि. जळगाव, सध्या रा. खंडाळा) असे मृत मुलीचे नाव आहे. भांबरे कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून खंडाळ्यात वास्तव्याला आहे. पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अनुष्का ही लोणंद येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. तिचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. आई गृहीणी आहे. अनुष्का ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. गुरुवारी सायंकाळी ती शाळेतून घरी आल्यानंतर शाळेच्या कपड्यावरच बाथरूममध्ये गेली. बराचवेळ ती बाहेर न आल्याने आईने आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आईने पतीला फोन केला. वडिल घरी आल्यावर त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी अनुष्का रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. यानंतर आई-वडिलांनी तिला उपचारासाठी शिरवळ येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अनुष्काने आपल्या हातावर धारदार कटरने वार करून गळा चिरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, खंडाळा पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांनी भेट दिली.