किंग कोब्रा सोबत फोटोसेशन व हाताळल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कर्नाटकातील कोडागू येथील फॉरेस्ट मोबाईल स्क्वॉड (एफएमएस) च्या अधिकार्यांनी सातारा येथील तिघांवर किंग कोब्रा सोबत फोटोसेशन करून त्याला हाताळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : कर्नाटकातील कोडागू येथील फॉरेस्ट मोबाईल स्क्वॉड (एफएमएस) च्या अधिकार्यांनी सातारा येथील तिघांवर किंग कोब्रा सोबत फोटोसेशन करून त्याला हाताळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नेचर सोशल फाउंडेशन-एस. एस. एफ, सातारा या नावाने हे तिघे संस्था चालवतात. विकास जगताप, जनार्दन भोसलेे यांच्यावर वन कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा साथीदार किरण आहिरे हा वन विभागाच्या तावडीतून पळून गेला.
हे तिघे वाचवलेल्या एका किंग कोब्राचे छायाचित्र घेण्यासाठी कोडगुला (कुर्ग - मडीकेरी) येथे गेले होते. किंग कोब्रा आणि लोकेशनवरील त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्यांचा पाठलाग करणार्या फॉरेस्ट मोबाईल स्क्वॉड गुप्तहेरांना ते कोडगुमध्ये असल्याची तसेच दोघेजण त्यांच्या कारमध्ये किंग कोब्रा घेऊन जात आहेत, अशी माहिती गुप्तहेरांमार्फत फॉरेस्ट विभागाला समजली. स्क्वॉडने बेळगाव पथकाला सतर्क केले आणि गुरुवारी संध्याकाळी बेळगाव येथे संबंधितांची कार पकडली. मात्र, त्यांच्याकडे साप सापडला नाही. परंतु, त्यांच्या मोबाईवर किंग कोब्रासोबत पोज देताना डझनभर फोटो सापडले. यामुळे त्यांना कोडगुला परत येण्याची नोटीस दिली. परंतु, त्यांनी ही नोटीस धुडकावली.
त्यामुळे फॉरेस्ट मोबाईल स्क्वॉडने गुरुवारी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि दोघांना ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्राची मदत घेतली आहे. दरम्यान, वन अधिकार्यांनी काही स्थानिक सर्प बचावकर्त्यांची ओळख पटवली आहे. ते या दोघांना किंग कोब्रासोबत फोटो काढण्यास मदत करत होते. सहाय्यक वनसंरक्षक गणश्री यांनी केलेल्या चौकशीत विकास जगताप यांनी केलेल्या कृत्याचा कबुली जबाब दिला आहे. मात्र, त्याच्या सोबत असलेला किरण आहिरे हा पसार आहे.
काही वर्षांपूर्वी पुण्यात किंग कोब्राची बेकायदेशीर हाताळणी आणि वाहतूक केल्याची तक्रार आली होती. सर्पमित्र म्हणून मिरवणारे 4 हजार रुपयांना किंग कोब्रासोबत फोटो देत होते. या तस्करांचे सातार्याशी कनेक्शन आहे. सर्प तस्करांच्या मुळाशी जाऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हे वनविभागासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. सातार्यातील तीन जण या प्रकरणात समोर आले असले तरी सर्प तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट यानिमित्त उघडकीस येण्याची शक्यता आहे.