माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची दुबार मतदान नोंदणी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने नेमलेल्या मतदार सत्यशोधन समितीचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील समिती मतदार संघातील वाढीव मतदार तसेच दुबार मतदार नोंदणीची चौकशी करत आहे.
कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने नेमलेल्या मतदार सत्यशोधन समितीचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील समिती मतदार संघातील वाढीव मतदार तसेच दुबार मतदार नोंदणीची चौकशी करत आहे. मात्र 2014 व 2019 ची कराड दक्षिण मधील निवडणूक फसवणूक करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच मतदान चोरी करत विजय मिळवल्याचा खळबळजनक दावा सैदापूरचे उपसरपंच मोहनराव जाधव यांच्यासह भाजपाच्या पदाधिकार्यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
चव्हाण यांच्याच कुटुंबातील नातेवाईकांची कराड दक्षिण व पाटण मतदारसघात दुबार- तिबार मतदान नोंदणी असल्याचा दावा करीत मतदार यादीचा पुरावा पत्रकार परिषदेत स्क्रीनवर दाखवण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, शहराध्यक्ष सुषमा लोखंडे, माजी नगरसेवक सुहास जगताप, अतुल शिंदे, मलकापूरचे माजी नगरसेवक राजेंद्र यादव उपस्थित होते.
चव्हाण कुटुंबातील संबंधित लोकांनी कराड दक्षिण मतदार संघात बोगस नोंदणी करून बनावट मतदार तयार केले. मतदार नोंदणी फॉर्ममध्ये जाणीवपूर्वक खोटी माहिती भरली गेली. तसेच एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी नोंदवून त्याला वारंवार मतदानाची संधी दिली गेली असल्याचे सांगण्यात आले.
चव्हाण कुटुंबातील अनेक सदस्यांची वेगवेगळ्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी केली गेली आहे. अनेक सदस्यांची कराड दक्षिण व पाटण मतदारसंघात नोंदणी केली आहे. कराड दक्षिण मतदार संघातील कराड आणि मलकापूर या दोन्ही ठिकाणी माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबातील लोकांची मतदार नोंदणी केली गेली आहे. तसेच पाटण मतदारसंघातील कुंभारगाव मध्ये या व्यक्तींची दुबार आणि तिबार नोंदणी केली असल्याचेही यावेळी उपस्थितांनी पुराव्यासह सांगितले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत पंजाबराव चव्हाण हे 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत मुख्य निवडणूक प्रतिनिधी राहिलेले असून त्यांनी आपल्या वडिलांचे नाव व वय यामध्ये फरक दाखवून आपले नाव दोन मतदारसंघात नोंद केल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.
आशा इंद्रजीत चव्हाण यांनी आपल्या नावामध्ये फरक दाखवल्याचे दिसून आले असून कराड मतदार संघात नाव आशा व वय 47 तर मलकापूर येथे नाव आशा वय 46 आणि पाटण मतदारसंघात नाव आशाताई वय 44 असे आढळून आल्याचेही यादीत दिसून येत आहे.
शांतादेवी चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदार संघातील कराड येथे 87 आणि मलकापूर येथे 86 असा वयामध्ये फरक दाखवून मतदार यादी मध्ये नाव नोंद केल्याचे दिसून येते येत असून अभिजीत इंद्रजीत चव्हाण यांनी मलकापूर येथे आगाशिवनगर व इंद्रप्रस्थ बंगलो असे पत्ता दाखवून आपले नाव दोन ठिकाणी नोंद केल्याचे मतदार यादीत दिसून आले आहे.
राहुल विजयसिंह चव्हाण यांनी पाटण कॉलनी बूथ 131 येथे वय 53 व कुंभारगाव येथे बूथ 379 येथे वय 52 दाखवून आपले नाव दोन ठिकाणी नोंद केल्याचे दिसून आले आहे.
गौरी राहुल चव्हाण यांनी पाटण कॉलनी बूथ 131 व कुंभारगाव बूथ 389 येथे वय बदलून आपले नाव नोंद केल्याचे दिसून आले आहे तर अधिकराव अण्णासाहेब चव्हाण यांनी कुंभारगाव व पाटण कॉलनी कराड येथे वडिलांचे नाव अण्णासो व अण्णासाहेब असे दाखवून आपले नाव दोन ठिकाणी नोंद केल्याचे दिसून आले आहे.
मंगल अधिकराव चव्हाण यांनी पाटण कॉलनी व कुंभारगाव या दोन ठिकाणी वयाचा फरक दाखवून आपले नाव नोंद केल्याचे तर राजेश वसंतराव चव्हाण यांनी पाटण कॉलनी व कुंभारगाव येथे अनुक्रमे वही वर्ष 52 व 56 असे दर्शवून आपले नाव नोंद केल्याचे दिसून आले आहे.
एकूण नऊ नावे मतदार यादीत असणारे हे सर्व लोक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कुटुंबीय असून गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हे लोक बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरच्या पत्त्यावर म्हणजे पाटण कॉलनी कराड येथे एकूण 15 लोक मतदार म्हणून नोंद आहेत. यातील बहुतांशी लोक सदर ठिकाणी राहत नसून त्यांची नावे व पत्त्याबरोबरच इतर ठिकाणीही दिसून येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सांगण्यात आली.