मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रोफाईलचा गैरवापर; एकजण ताब्यात

राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या प्रोफाईल फोटोचा गैरवापर करून बनावट अकाऊंटद्वारे चुकीचे मेसेज पाठविण्याचा प्रकार वडूज पोलिसांनी उघड केला आहे.
दहिवडी : राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या प्रोफाईल फोटोचा गैरवापर करून बनावट अकाऊंटद्वारे चुकीचे मेसेज पाठविण्याचा प्रकार वडूज पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वडूज पोलिसांनी दिली.
मंत्रीजयकुमार गोरे यांच्या प्रोफाइल पिक्चरचा गैरवापर करीत एका फेक अकाऊंटवरून समाजमाध्यमाद्वारे काही महिला, नागरिकांना फ्रेंड रिक्वेस्ट, पैशांची तसेच फोन नंबरची मागणी करणारे मेसेज पाठविण्यात आले होते. याबाबत काहींनी मंत्री गोरे यांचे सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख शेखर पाटोळे यांना विचारणा केली. मंत्री गोरे यांच्या छायाचित्राचा गैरवापर करून चुकीचे मेसेज पाठविण्यात येत असल्याचे समजताच शेखर पाटोळे यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.
पोलिसांनी सायबर विभागाची मदत घेऊन फेक अकाऊंट तयार करणाऱ्याचा शोध घेतला असता खटाव तालुक्यातील एका व्यक्तीच्या मोबाईलवरून मेसेज पाठविले जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल सायबर विभागाकडे तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे, तसेच त्या व्यक्तीचे सीडीआर तपासण्यात येणार असल्याचे सांगितले.