सुरवडी येथे 2 तोळ्यांचा ऐवज लंपास

सुरवडी, ता. फलटण येथे घराबाहेर अंगणात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांचा सोन्याचा डाग हिसकावून घेवून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
साखरवाडी : सुरवडी, ता. फलटण येथे घराबाहेर अंगणात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांचा सोन्याचा डाग हिसकावून घेवून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरवडी गावातील यमुना सर्जेराव जगताप या आपल्या घरासमोर अंगणात झोपल्या होत्या. अंधाराचा फायदा घेत दोन चोरटे हळूच घरासमोर आले आणि झोपलेल्या महिलेला लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील दागिना ओढून नेला. महिलेने आरडाओरडा करताच चोरटे पसार झाले. महिलेचा आवाज ऐकून शेजारी पाजारी गोळ्या झाल्यानंतर घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून यामध्ये चोरटे कैद झाले आहेत. यावरून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे सुरवडीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.