जावलीतील जवानाचे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जावली (ता. फलटण) येथील देवदास दिलीप रजपूत यांचे कर्तव्यावर असताना गुरुवारी (दि. 21) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सातारा : जावली (ता. फलटण) येथील देवदास दिलीप रजपूत यांचे कर्तव्यावर असताना गुरुवारी (दि. 21) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते जोधपूर राजस्थान येथे नर्सिग असिस्टंट या पदावर भारतीय सैन्य दलात कार्यरत होते.
देवदास रजपूत यांना कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना समजताच जावली गावासह फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. झुलॉजीमधून एम एसस्सी उच्च पदवी प्राप्त केलेल्या देवदास रजपूत हे 2017 मध्ये सैन्यामध्ये भरती झाले. सैन्यात भरती झाल्यानंतर सुरुवातीला लखनऊ उत्तर प्रदेश येथे त्यांनी सैन्य दलाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांनी जम्मू व पुणे या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. सध्या ते जोधपूर राजस्थान येथे कर्तव्य बजावत होते.
जिद्दी व देश प्रेमी असलेल्या देवदास रजपूत यांना डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करावयाचे होते. मात्र, परिस्थितीमुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांना पूर्ण करता आले नाही. या गोष्टीचा पश्चाताप न करता ते देश सेवेसाठी सैन्य दलात 2017 ला दाखल झाले. 2018 ला त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांचा सांभाळ करीत आपल्या भावंडांना शिकवले, सांभाळ केला.
देवदास रजपूत यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जावली, माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण येथेतर बीएससी मुधोजी महाविद्यालय येथे पूर्ण केले . एम एससी ची पदवी शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केली. त्यांच्या पश्चात आई लता, पत्नी अमृता, शौर्य आणि वीर ही दोन मुले, महेश व अमर हे दोन भाऊ. अमर हा धाकटाभाऊ मराठा लाईट इन्फंट्री मध्ये सेवारथ आहे.
देवदास रजपूत यांच्या निधनाने संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.