राज्यात चोरीचे मोबाईल शोधण्यात सातारा अव्वल

मोबाईल चोरी, गहाळ झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात ‘सातारा पोलिस दल बेस्ट’ ठरले आहे. भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभाग लवकरच गौरव करणार आहे.
सातारा : मोबाईल चोरी, गहाळ झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात ‘सातारा पोलिस दल बेस्ट’ ठरले आहे. भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभाग लवकरच गौरव करणार आहे. त्यासाठी ‘सीईआयआर’ (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर) हे पोर्टल प्रभावी ठरत असून आतापर्यंत 2200 जिल्हावासियांना मोबाईल परत मिळाले आहेत. यामुळे सातारकरांनो, मोबाईल हरवला, गहाळ झाला तर तुम्ही देखील सीईआयआरचा वापर करुन मोबाईल परत मिळवू शकता.
मोबाईल चोरी झाल्यानंतर पोलिस एफआयआर दाखल न करता केवळ गहाळ दाखल करुन घेत होते. यामुळे चोरीच्या मोबाईलचा तपास झाला का? तपास कधी होणार? मोबाईल कधी मिळणार? हा संशोधनाचा विषय होता. पोलिसांच्या या कामकाजामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. अजूनही भाजी मंडई, चार्जिंगला लावलेले मोबाईल, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हमखास चोरी होत आहेत. दिवसेंदिवस मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने ‘सीईआयआर’ या पोर्टलची निर्मिती केली.
गेल्या दीड वर्षापूर्वी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये ‘सीईआयआर’ या पोर्टलची पोलिसांना माहिती (ट्रेनिंग) दिले आहे. अगदी नागरिकांनाही या पोर्टलला वापर करणे शक्य आहे. या पोर्टलद्वारे पोलिस ज्यांचा मोबाईल हरवला आहे, त्याची माहिती ट्रेस करुन ते परत मिळवत आहेत. याच पोर्टलचा सातारा पोलिस दलाने प्रभावी वापर करत दीड वर्षात आतापर्यत 2200 मोबाईल जप्त केले आहेत.
मोबाईल चोरी झाल्यानंतर तक्रारदारांनी नजीकच्या पोलिस ठाण्यामध्ये आपल्या मोबाईलच्या आयएमईआय या क्रमांकासह मोबाईल गहाळचा अर्ज भरुन द्यायचा. पोलिस त्याला गहाळ क्रमांक देतात. यानंतर सीईआयआर या पोर्टलवर सर्व ती माहिती अपलोड केली जाते. जेव्हा चोरीचा मोबाईल अॅक्टीव्ह होतो. त्यावेळी या पोर्टलवर माहिती मिळते. पोलिस त्यानुसार कारवाई करुन मोबाईल जप्त करुन मूळ तक्रारदार यांना परत देतात.
चोरीचे मोबाईल परत मिळवून देण्यात सातारा पोलिस दलाला भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने ‘बेस्ट परफॉर्मन्सने’ सन्मानित केले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांचे योगदान राहिले आहे. सातारा पोलिस दलाचे यापुढेही सीईआयआर या पोर्टलद्वारे अधिक अधिक मोबाईल शोधून काढण्याचे प्रयत्न राहतील.