माण-खटाव मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

राजकारण करण्याच्यावेळी राजकारण करू. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये बघू. जग एवढे पुढे गेले, आम्ही उगाच एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा कामे करा.
देवापूर : राजकारण करण्याच्यावेळी राजकारण करू. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये बघू. जग एवढे पुढे गेले, आम्ही उगाच एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा कामे करा. माण-खटाव मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. माण-खटावचा विकास करण्यासाठी वाढप्याची भूमिका घेणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीला राष्ट्रवादीत नवीन चेहरे देणार असल्याचेही ना. पवार यांनी सांगितले.
दहिवडी (ता. माण) येथे सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, अनिल देसाई, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, उदयसिंह उंडाळकर-पाटील, संजय देसाई, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, मनोज पोळ, पृथ्वीराज गोडसे, डी. के. पवार, राजेंद्र पवार, मनोज देशमुख, नितीन भरगुडे-पाटील, राजेश पाटील वाठारकर, प्रमोद शिंदे, संजय झवर, श्रीमंत झांजुर्णे, महेंद्र देसाई, सुवर्णा देसाई, राजेंद्र राजपुरे, कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. अजितदादा पवार म्हणाले, सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीला मोठे पाठबळ दिले. घरात बसून चालणार नाही. तुम्ही खचू नका, सातार्याचा जनाधार राष्ट्रवादीसोबत राहिला आहे. या मातीशी आपुलकी आहे. आगामी निवडणुका डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. येथे मागील अनेक वर्षे सदाशिवराव तात्या, मदनअप्पा पिसाळ यांनी झेंडा फडकावला आहे. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 1999 साल होते. 25 वर्षांनंतर नवीन पिढी समोर येत असते. अनुभवी चेहरे व नवीन चेहरे आणले पाहिजेत. अनुभवी स्त्रियांनाा संधी द्यायची आहे. माण मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला बळ दिले जाईल. याची शंका मनात आणू नका. पक्षवाढीसाठी प्रयत्न करा. वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी जोडा. माण तालुक्यात काम करणार्यांना एकटे वाटू देऊ नका.
विकासकामे झाली पाहिजेत, ही शिकवण स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या विकासाचा पाया रचला. आपणाला शिखर गाठायचे आहे. त्यांनी महाराष्ट्राला समृद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श ठेवूनच काम करत असल्याचे अजितदादांनी सांगितले.
खा. नितीन पाटील-अनिल देसाई जोडगोळीचे उत्तम काम
अनिल देसाई हा माणच्या जनतेशी नाळ जोडलेला घट्ट कार्यकर्ता आहे. सर्वांच्या सुख-दु:खात ते सहभागी होत असतात. जिल्हा बँकेला अध्यक्षपदी खा. नितीन पाटील तर उपाध्यक्ष म्हणून अनिल देसाई ही जोडी उत्तम काम करत आहे. मतदारसंघातील प्रलंबित पाणी योजनांचे प्रश्न अनिल देसाईंच्या माध्यमातून सोडवले जातील. अनिल देसाई व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद उभी करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.