किल्ले संवर्धनाची सरकारकडून फक्त घोषणाच : खा. नीलेश लंके

राज्यातील महायुती सरकारकडून किल्ल्यांच्या संवर्धनाची घोषणा केली आहे. प्रतापगडसह 12 किल्ल्यांना जागतिक वारसास्थळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे किल्ले संवर्धनाची घोषणा ही प्रत्यक्ष कृतीत आली पाहिजे.
प्रतापगड : राज्यातील महायुती सरकारकडून किल्ल्यांच्या संवर्धनाची घोषणा केली आहे. प्रतापगडसह 12 किल्ल्यांना जागतिक वारसास्थळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे किल्ले संवर्धनाची घोषणा ही प्रत्यक्ष कृतीत आली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि त्यांच्याच गडकिल्ल्यांच्या कडे दुर्लक्ष करता, अशी टीका खा. नीलेश लंके यांनी केली.
‘गड जपा इतिहास जपा हीच खरी शिव सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन किल्ले प्रतापगडवर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेनंतर खा. लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, आ. जयंत पाटील, डॉ. नितीन सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व आपला मावळा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
सर्व नेत्यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मोहिमेस सुरुवात केली. किल्ले प्रतापगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. या मोहिमेत प्रतापगडावर स्वच्छता करण्यात आली. तसेच आपला मावळा प्रतिष्ठानतर्फे साईन बोर्ड देखील लावण्यात आले. यावेळी प्रामुख्याने गड स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वतः खा. नीलेश लंके यांनी तटबंदी वर चढून गवत काढले.
यावेळी खा. नीलेश लंके म्हणाले, सरकारकडून किल्ल्यांच्या संर्वधनाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, असे असले तरी केवळ सरकारवर टीका करण्यापेक्षा फक्त एक ठिणगी म्हणून काम करणे महत्वाचे आहे. आम्ही ते मावळा प्रतिष्ठानच्यावतीने करत आहोत, याचा आनंद आहे. प्रतापगडनंतर राज्यातील अनेक किल्ल्यांवर अशाच प्रमाणे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
यावेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाले, खा. नीलेश लंके यांच्या आपला मावळा प्रतिष्ठानच्यावतीने महाराष्ट्रात गड किल्ले संवर्धनाचा कौतुकास्पद असा उपक्रम राबवला आहे. मावळा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गडांवर आणि दुर्लक्षित गडावर जाऊन स्वच्छतेचे काम करतात तसेच या ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा त्यांच्यामार्फत केले जातेय. यावेळी पर्यावरणाचा संदेश सुद्धा यावेळी दिला जात आहे. या किल्ल्यांवरून दिलेला संदेश महाराष्ट्रात पोहोचवण्याचे काम आपण या ठिकाणी करतोय.